मुंबई : अल्पभूधारक शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल, असे तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री विकसित करण्यासाठी आयआयटीच्या संशोधकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी मंगळवारी केले.
कृषिमंत्री भुसे यांनी मंगळवारी आयआयटीला भेट दिली. यावेळी त्यांनी रुरल टेक्नॉलॉजी ॲक्शन ग्रुप, सितारा ग्रुपचे प्राध्यापक, संशोधक यांच्याशी संवाद साधला. या ग्रुपच्या साहाय्याने शेती तंत्रज्ञानावर केल्या जात असलेल्या संशोधनाची माहिती घेतली, प्रकल्पांना भेट दिली. यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) संचालक इंद्रा मालो, आयआयटीचे संचालक डॉ. सुभाषीश चौधरी, प्रा. आनंद राव, आदी उपस्थित होते.
यावेळी भुसे म्हणाले की, अल्पभूधारक शेतकऱ्यांसमोरील समस्या सोडविण्यासाठी त्यांना उपयुक्त ठरतील आणि निविष्ठा खर्चात कपात होईल, असे तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री विकसित करण्यावर आयआयटीने भर द्यावा. राज्यातील विविध भागांत अनेक प्रयोगशील शेतकरी आपल्या अनुभवांतून विविध तंत्रज्ञान, यंत्रसामग्री विकसित करतात. त्यांच्या संशोधनाला तांत्रिक आणि शास्त्रीय पद्धतीने विकसित करण्यासाठी आयआयटी आणि कृषी महाविद्यालयांनी एकत्रित यावे, असे आवाहनही भुसे यांनी यावेळी केले.