Join us

नौदलाच्या मुंबईतील पश्चिम कमांडमध्ये अतिनील निर्जंतुकीकरण सुविधा विकसित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 5:21 PM

कोरोनाचा प्रसार थांबत नसल्याने व भविष्यात कोरोनासोबत जीवन जगण्याची वेळ येण्याची शक्यता असल्याने नौदलाच्या गोदीत जाण्यायेण्यासाठी सुरक्षिततेचा उपाय म्हणून मुंबईतील नौदल डॉकयार्ड तर्फे एक अतिनील स्वच्छता बे (अल्ट्रा व्हायलेट सँनिटायझर बे) तयार करण्यात आला आहे.

मुंबई : कोरोनाचा प्रसार थांबत नसल्याने व भविष्यात कोरोनासोबत जीवन जगण्याची वेळ येण्याची शक्यता असल्याने नौदलाच्या गोदीत जाण्यायेण्यासाठी सुरक्षिततेचा उपाय म्हणून मुंबईतील नौदल डॉकयार्ड तर्फे एक अतिनील स्वच्छता बे (अल्ट्रा व्हायलेट सँनिटायझर बे) तयार करण्यात आला आहे. या अतिनील उपकरणाचा उपयोग कोरोना विषाणूच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी साधने, कपडे आणि इतर विविध वस्तूंच्या निर्जंतुकीकरणासाठी केला जाईल. अतिनील-सी (UV-C) प्रकाशयोजनेसाठी अँल्युमिनियम शीट्सच्या विद्युतीय व्यवस्थेच्या बनावटीद्वारे एका मोठ्या सामान्य खोलीचे अतिनील बे मध्ये रूपांतर करणे हे एक मोठे आव्हानात्मक कार्य होते. ते कार्य नौदलाच्या गोदीतील अधिकाऱ्यांना पेलण्यात यश आले आहे. 

ज्या वस्तूंचे निर्जंतुकीकरण करायचे आहे त्यांच्याकडे अतिनील-किरणोत्सर्गासाठी अतिनील-सी प्रकाश स्रोत वापरले जाईल. नामांकित संशोधन संस्थाच्या अभ्यासानुसार यूव्ही-सी चा परिणाम सार्स (एसएआरएस), इन्फ्लूएंझा इत्यादी श्वसन रोग फैलावणाऱ्या विषाणूंवर परिणामकारकरित्या सिद्ध झाला आहे.सूक्ष्मजीव जंतू जेव्हा 1 मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त काळासाठी 1 जी / सेमी 2 तीव्रतेच्या अतिनील-सीच्या संपर्कात येतात तेव्हा ते कमी व्यवहार्य होतात, हे एक प्रभावी निर्जंतुकीकरण असल्याचे निदर्शनास आले आहे.  नौदल स्थानक (कारंजा) येथे देखील अशीच सुविधा तयार करण्यात आली आहे. अतिनील-सी स्टरलाइझर व्यतिरिक्त, एक औद्योगिक ओव्हन देखील ठेवण्यात आला आहे, 60 अंश सेल्सिअस तापमानात गरम होते, बहुतांश सूक्ष्मजंतूंचा नाश करण्यासाठीचे हे एक योग्य तापमान आहे. या माध्यमातून कोरोनाचा प्रसार रोखता येईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. सध्या ही सुविधा आगमन/निर्गमन ठिकाणी ठेवण्यात आली असून यामुळे  कोविड-19 चा प्रसार कमी करण्यास मदत होईल.

सध्या सुरु असलेले लॉकडाऊन उठवण्यात आल्यानंतर मोठी कर्मचारी संख्या असलेल्या विविध आस्थापनांमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नेमकी काय उपाययोजना करावी लागेल, मोठ्या संंख्येने येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा दृष्ट्रीने नेमकी कोणती पावले उचलावी लागतील याबाबत विविध ठिकाणी विचारविनिमय केला जात आहे. या पार्श्वभूमीवर नौदलाच्या अधिकाऱ्यांनी ही निर्मिती केली आहे. 

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्याकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस