विकासकाने कमावले हजारो कोटी, अनेक कुटुंब मात्र घराविना; विराेधी पक्षनेते फडणवीस यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 03:38 AM2021-02-19T03:38:07+5:302021-02-19T06:41:40+5:30

Devendra Fadnavis : गोरेगाव सिद्धार्थनगर-पत्राचाळ संघर्ष समितीच्या वतीने हक्काच्या घरासाठी आंदोलन आणि साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी आंदाेलकांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला.

The developer earned thousands of crores, but many families were homeless; Opposition leader Fadnavis's criticism | विकासकाने कमावले हजारो कोटी, अनेक कुटुंब मात्र घराविना; विराेधी पक्षनेते फडणवीस यांची टीका

विकासकाने कमावले हजारो कोटी, अनेक कुटुंब मात्र घराविना; विराेधी पक्षनेते फडणवीस यांची टीका

Next

मुंबई : आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात अनेक निर्णय घेण्यात आले. त्यात म्हाडाने स्वनिधीतून हे काम करावे, असे ठरले होते. पण आता एक वर्षापासून महाविकास आघाडी सरकारने हा गुंता प्रचंड वाढविला आहे. सरकारचे दुर्लक्ष अक्षम्य आहे. विकासकाने हजारो कोटी रुपये कमावले आणि अनेक कुटुंब घराविना आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
गोरेगाव सिद्धार्थनगर-पत्राचाळ संघर्ष समितीच्या वतीने हक्काच्या घरासाठी आंदोलन आणि साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी आंदाेलकांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. त्यानंतर येथील नागरिकांशी संवाद साधला. शिवाय या प्रकरणात झालेले बदल, घडामोडी जाणून घेतल्या.
गोरेगाव पत्रा चाळ येथील रहिवाशांनी आता हक्काच्या घरासाठी अनिश्चित काळाकरिता उपोषणाचे हत्यार उपसले आहे. मंगळवारपासून गोरेगाव येथे हे उपोषण सुरू झाले असून, म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी रहिवाशांच्या करारातील हक्क मारण्यात तत्परता दाखवल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
जे पत्राचाळ रहिवासी बेघर झाले आहेत; त्याला म्हाडा जबाबदार आहे. कारण म्हाडाने ना हरकत प्रमाणपत्र दिले नसते तर ९ त्रयस्थ विकासकांना जमीन विकली गेली नसती. त्यामुळेच म्हाडाची घरे, पुनर्वसनाची घरे अपूर्णावस्थेत राहिली आहेत, असा आंदोलनकर्त्यांचा आराेप आहे.

घराचे काम सुरू करणार
उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी सरकारने दखल घेतली. पत्राचाळ संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला सह्याद्रीवर बोलावले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समितीच्या सदस्यांना आश्वासन दिले की, पत्राचाळीचा विषय हा अग्रस्थानी आहे. १५ दिवसांत येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आपला विषय घेऊन लवकरच 
घराचे काम सुरू करण्यात येईल. भाड्याचा विषय सोडविण्यात येईल. इतर विषय टप्प्याटप्प्याने घेऊ. यावेळी मकरंद परब, परेश चव्हाण आणि इतर उपस्थित होते. दरम्यान, गुरुवारी रात्री उशिरा आंदाेलकांनी उपाेषण मागे घेतले.

Web Title: The developer earned thousands of crores, but many families were homeless; Opposition leader Fadnavis's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.