मुंबई – दोन महिन्यांपूर्वी झालेल्या एका सर्वेक्षणानुसार ६८ टक्के अनिवासी भारतीयांनी (एनआरआय) शेअर बाजारापेक्षा (१६ टक्के) मालमत्तेतील गुंतवणूकीला प्राधान्य असल्याचे निदर्शनास आले होते. त्या एनआरआयसह स्थानिक इच्छुकांना गृह खरेदीसाठी प्रवृत्त करण्यासाठी बहुतांश विकासकांनी डिजीटल प्लॅटफाँर्मचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या संकटात ठप्प झालेल्या गृह खरेदीला त्यातून चालना मिळेल अशी त्यांची आशा आहे.
अनराँक या सल्लागार संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार एनआरआयच्या मानसिकतेचा अंदाज घेण्यात आला होता. सध्या कोरोनाच्या संकटामुळे भारतीय रुपयाचे झपाट्याने अवमूल्यन होत आहे. डाँलरचा भाव वधारला आहे. आर्थिक कोंडी झालेले विकासक बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतीतली घरे थोडी किंमती कमी करून विकण्यासही तयार आहेत. शेअर बाजारातील चढ उतारांमुळे तिथली गुंतवणूकही सुरक्षित राहिलेली नाही. त्याशिवाय ठेवींवरील घटते व्याजदर आणि खासगी बँका दिवाळखोरीत निघण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे एनआरआय मालमत्तेतील गुंतवणूकीबाबत विचार करू शकतील असे मत अँनराँकचे संचालक प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून नामांकित विकासकांनी डिजीटल माध्यमातून आँनलाईन पद्धतीने घरांच्या खरेदी विक्रीला चालना देण्याचे प्रयत्न चालविले आहेत. मुंबईतल्या एका नामांकित विकासकाने लाँकडाऊनच्या काळातही ५०० घरांचे व्यवहार केल्याचा दावा अँनरॅकने केला आहे. सध्याचे लाँकडाऊन आणि भविष्यातील सोशल डिस्टिंसिंगचे निर्बंध यांचा विचार करता बहुतांश विकासक आपले डिजीटल प्लॅटफाँर्म अधिक यूझर फ्रेंडली करण्याच्या प्रयत्नात आहेत. प्रकल्पाच्या ठिकाणांचे फोर डी गो थ्रू, घरांतील अंतर्गत रचना ग्राहकांना घर बसल्या पाहता येईल. त्या आधारे ते बुकिंग करू शकतील यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यातून गृह खरेदीसाठी इछूक असलेले स्थानिक ग्राहक आणि एनआरआयना देखिल आकर्षित करण्याचे मनसुबे आहेत. १० ते १५ टक्के विकासकांचे त्या धर्तीवरील व्यवहार सुरू झाल्याचेही अनराँकचे म्हणणे आहे.
--------------------------------
प्रतिसादाबाबत मत- मतांतरे
कोरोनाचा प्रभावाने जगभरात आर्थिक मंदीचे सावट असताना एनआरआयकडून किती प्रतिसाद मिळेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल असे मत नरेडकोचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी यांनी नुकत्याच झालेल्या एका वेबिनारमध्ये व्यक्त केले होते. त्यामुळे या प्रयत्नांबाबत मत- मतांतरे असल्याचेही अधोरेखित होते. त्याशिवाय ग्राहकांनी डिजीटल प्लॅटफाँर्मवर प्रकल्पांची माहिती घेतली आणि आँनलाईन टोकन दिले तरी प्रत्यक्ष प्रकल्पाला भेट दिल्याखेरीज खरेदी होत नाही. एनआरआयसुध्दा विकासकांची विश्वासार्हता तपासूनच खरेदीबाबतचा विचार करतात असे मत अँनराँकच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले आहे.