Join us

मालमत्ता कर थकविणाऱ्या विकासकांवर टाच येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई - उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता कराचे तब्बल २० हजार कोटी रुपये अनेक वर्षांपासून थकीत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई - उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता कराचे तब्बल २० हजार कोटी रुपये अनेक वर्षांपासून थकीत आहेत. यांपैकी १५०० कोटी रुपये विकासकांनी थकविले आहेत. अशा ५० थकबाकीदारांची यादी महापालिकेने तयार केली आहे. कोट्यवधी रुपये थकविणाऱ्या विकासकांच्या मालमत्तावर टाच आणण्याचे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी शुक्रवारी प्रशासनाला दिले.

सन २०२० -२०२१ आर्थिक वर्षात पाच हजार ३०० कोटींपैकी केवळ ९५० कोटी आतापर्यंत जमा झाले आहेत; तर डिसेंबर २०२० पर्यंत एकूण १९ हजार ५०० कोटी रुपये थकीत आहेत. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’च्या शुक्रवारच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आले होते. हा मुद्दा विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी स्थायी समितीच्या बैठकीत उचलून धरला. सर्वसामान्य नागरिकांनी कर वेळेवर न भरल्यास त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात येते. मात्र कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर थकविणाऱ्या विकासकांवर मेहेरबानी का दाखवली जाते? असा सवाल त्यांनी केला. या थकबाकीदारांकडून मालमत्ता कर वसूल करण्यात यावा, अन्यथा त्या थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करावी, अशी मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी केली.

हॉटेल ताज लँड एन्ड वांद्रे : ३५ कोटी रुपये

बिच रिसॉर्ट : २२ कोटी रुपये

बॉम्बे क्रिकेट असोसिएशन : ३४ कोटी रुपये

वरळी वल्लभभाई स्टेडियम : २८ कोटी रुपये

मुंबई विमानतळ : २५ कोटी रुपये

रेडियस अँड डीझर्व्ह बिल्डर : २८.४२ कोटी

तुलसानी : २८.४३ कोटी

विमल असोसिएट : २२.३६ कोटी

वैदेही आकाश हौसिंग : १९.५३ कोटी

शिवस्वामी कृपा : ३५ कोटी

हलकारा : २३.८९ कोती

ओमकार : २३.११ कोटी

बी.जी. शिर्के टेक्नॉलॉजी : १९.९८ कोटी

शिवसेनेने फोडले भाजपवर खापर

मुंबईतील ५०० फुटांपर्यंतच्या घरांचा संपूर्ण मालमत्ता कर माफ करावा, यासाठी शिवसेनेने महापालिकेत २०१९ मध्ये प्रस्ताव मंजूर करून आपले वचन पाळले. मात्र, हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला त्याचे श्रेय मिळू नये, यासाठी संपूर्ण करमाफीचा प्रस्ताव रखडवला, असा आरोप स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला.