मुंबई : भांंडुप, मुलुंड स्थानकांचा भविष्यात होणारा विकास रखडला असल्याचे समोर आले आहे. राज्य सरकारने या स्थानकांचा विकास करण्यास असमर्थता दर्शविली आहे. या स्थानकांचा विकास जागा उपलब्ध नसल्यानेच होणार नसल्याचे एमआरव्हीसीकडून सांगण्यात आले. एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) काही स्थानकांचा स्वतंत्रपणे विकास करण्याचा निर्णय साधारण दोन वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. यात खासकरून भांडुप आणि मुलुंड स्थानकाचा विकास करतानाच त्या स्थानकात अनेक सोईसुविधा देण्यात येणार होत्या. यासाठी एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांकडून या स्थानकांची दोन वेळा पाहणी करून अहवालही तयार केला. त्या अहवालानुसार या स्थानकात सरकते जिने, उत्तम आसनव्यवस्था, प्रसाधनगृहे, चांगले खाद्यपदार्थांचे स्टॉल, पार्किंगची व्यवस्था देण्यात येणार होती. परंतु स्थानकात आणि स्थानकाबाहेर उपलब्ध नसलेली जागा यामुळे प्रकल्प राबविण्यासाठी राज्य सरकारकडूनच असमर्थता दर्शविण्यात आली आहे. याबाबत एमआरव्हीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांनी सांगितले की, या दोन्ही स्थानकांचा विकास केला जाणार होता. यात अनेक सोईसुविधांचा समावेश होता. मात्र जागाच उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आणि राज्य सरकारनेही जागा उपलब्ध नसल्याने सध्यातरी या सोईसुविधा देऊ नका, असे सांगितले आहे. त्यामुळे या दोन्ही स्थानकांवर सुविधा देता येणार नाही. (प्रतिनिधी)
भांडुप, मुलुंड स्थानकाचा विकास रखडला
By admin | Published: June 13, 2015 4:13 AM