विकास मंडळांना लवकरच मुदतवाढ! मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 06:25 AM2020-06-10T06:25:28+5:302020-06-10T06:26:04+5:30
मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव येणार
मुंबई : विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाच्या मुदतवाढ देण्याची शिफारस राज्यपालांना करणारा ठराव राज्य मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत मांडण्यात येणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत आपण याबाबत भूमिका मांडली, असे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी माध्यमांना सांगितले. प्रादेशिक समतोल साधण्यासाठी सदर विकास मंडळांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचा सूर मंत्रिमंडळ बैठकीत व्यक्त झाला.
या तिन्ही मंडळांचा कार्यकाळ गेल्या ३० एप्रिल रोजी संपुष्टात आला होता. मुदतवाढ देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने तशी शिफारस राज्यपालांकडे करावी लागेल. नंतर राज्यपाल केंद्रीय गृह मंत्रालयाकडे शिफारस करतील. गृहमंत्रालयाच्या मंजुरीनंतर राष्ट्रपतींच्या मंजुरीने मुदतवाढ मिळेल.
विकास मंडळांना मुदतवाढ न दिल्याने विदर्भ मराठवाड्यासारख्या मागास भागात अस्वस्थता आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत एक पत्र पाठवून विकास मंडळांना मुदतवाढ तत्काळ देण्याची मागणी याआधी केली
होती.