मुंबई : नरेंद्र्र मोदी सरकार ठरावीक १५-२० उद्योगपतींची चौकीदारी करत आहे. मात्र सर्वसामान्यांना सरकारने वाºयावर सोडले असून सर्वसामान्यांच्या खिशातील पैसा मल्ल्या, नीरव मोदी यांच्यासारख्या उद्योगपतींच्या घरात गेला. देशातील उद्योगधंदे बंद पडत आहेत, पण मोदी, देवेंद्र फडणवीस अर्थव्यवस्थेवर बोलण्यास अजिबात तयार नाहीत, असा टोला काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी लगावला. धारावी येथील ९० फूट रस्त्यावर काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्यासाठी आयोजित केलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते.
राहुल म्हणाले, नोटाबंदीमध्ये सर्वसामान्यांना रांगेत उभे राहावे लागले. मात्र अदानी, अंबानी रांगेत उभे होते का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. देशात लघू, मध्यम उद्योग बंद पडत आहेत. धारावीतील अनेक छोटे युनिट बंद पडत आहेत, मात्र सरकार याकडे लक्ष देण्यास तयार नाही. गब्बर सिंग टॅक्स (जीएसटी) मुळे फायदा झालेला एक तरी व्यापारी तुमच्या नजरेत आहे का? सरकारने अनेक कायदे बदलले, मात्र जीएसटी कायदा बदलण्यास ते तयार नाहीत. अर्थव्यवस्थेची स्थिती अशीच राहिली तर आणखी गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.बेरोजगार तरुण, शेतकरी, त्रासलेली जनता सरकारकडे न्याय मागत आहे. जर त्यांना न्याय मिळाला नाही तर हा वर्ग सरकारकडून झगडून न्याय मिळवेल. देशाचे भविष्य बदलण्याची ताकद मूठभर उद्योगपतींमध्ये नाही तर सर्वसामान्य तरुण, शेतकरी, लघू व मध्यम उद्योजक यांच्यामध्ये आहे. पण त्यांच्या हातातील अडचणीची हातकडी काढल्यास चमत्कार होईल, मात्र हे करण्याची विद्यमान सरकारची क्षमता नाही. हे काम काँग्रेसच करू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेस खोटी आश्वासने देत नाही. सरकारने कर्जमाफी केल्याचा दावा केला होता. मात्र तुमच्यापैकी कुणाचे कर्ज माफ झाले आहे का, असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर कुणाचेही नाही, असे उत्तर श्रोत्यांमधून आले. पैसा गोरगरिबांचा व त्यातून अदानी, अंबानी मौजमजा मारतात, असा आरोप त्यांनी केला. मोठ्या उद्योगपतींना लाखो कोटी रुपये देण्याऐवजी लहान उद्योजकांना निधी उपलब्ध करून दिल्यास अर्थव्यवस्था अधिक बळकट होऊ शकेल. जेव्हा देशातील सर्वसामान्य पुढे जातील तेव्हाच खºया अर्थाने देश पुढे जाईल, असे ते म्हणाले.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, अविनाश पांडे, नदीम जावेद, रवी राजा, बब्बू खान, हुकूमराज मेहता, उमेदवार वर्षा गायकवाड, शिवकुमार लाड, प्रवीण नाईक, गणेश यादव या वेळी उपस्थित होते.अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यास काय केले?काँग्रेसने सत्तर वर्षांत काय केले हा प्रश्न मोदी नेहमी विचारतात, पाच वर्षांत जीएसटी, नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान मोदींच्या सरकारने केले ते काँग्रेसने केले नाही, असा पलटवार त्यांनी केला. मेक इन इंडियाची घोषणा करणाऱ्यांनी मेक इन धारावीकडे दुर्लक्ष केले. प्रत्येक शहरात धारावी आहे. जे धारावी समजू शकले नाही, ते देश समजू शकत नाहीत. तसेच उद्योग, अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी काय केले याचे उत्तर द्या, असे आव्हान राहुल गांधी यांनी मोदी व फडणवीसांना दिले.