Join us

अंधेरी येथील पालिकेच्या क्रीडा संकुलाचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 4:09 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई - महापालिकेच्या अंधेरी येथील क्रीडा संकुलात पुढच्या वर्षी आशियाई महिला करंडक फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई - महापालिकेच्या अंधेरी येथील क्रीडा संकुलात पुढच्या वर्षी आशियाई महिला करंडक फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या क्रीडा संकुलामध्ये ६० लाख रुपये खर्च करून मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामांसाठी पालिकेमार्फत बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठानला निधी देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली.

आशियाई महिला फुटबॉल स्पर्धा २०२२ चे आयोजन या क्रीडा संकुलात करण्यात आले आहे. या मोठ्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि एशियन फुटबॉल फेडरेशनचे पदाधिकारी यांच्यामध्ये बैठक झाली होती. त्यानुसार २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

अंधेरी येथील क्रीडा संकुलामध्ये मोठ्या प्रमाणात दुरुस्तीची आवश्यकता आहे. तसेच आवश्यक सेवा - सुविधा आणि रंगरंगोटी करण्यात येणार आहे, तसेच या स्पर्धेसाठी पायाभूत सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी ६० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. क्रीडा संकुलाला निधी देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये नुकताच मंजूर करण्यात आला.