Join us

कलिना संकुलाचा विकास ठप्पच; ४० महिने उलटूनही गाडी पुढे सरकेना, प्रतीक्षा मास्टर प्लानची

By सीमा महांगडे | Published: March 24, 2023 10:50 AM

एमएमआरडीएला मुंबई विद्यापीठाच्या कालिना परिसर विकासाचा मास्टर प्लान तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसराचा आधुनिक पद्धतीने विकास करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) सोपविण्यात आला आहे. दरम्यान, एमएमआरडीएकडून कन्सल्टन्ट कंपनीही नेमण्यात आली असून तब्बल १ कोटी १२ लाखांचा करारनामा झाला आहे. २०१९ पासून आतापर्यंत जवळपास ४० महिने उलटूनही अद्यापही मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलाचा विकास ठप्प आणि जैसे थे आहे.

विकासकाम करणाऱ्या कन्सल्टंट एजन्सीची नेमणूक, त्यात होणारा राजकीय हस्तक्षेप, मुंबई विद्यापीठाला एमएमआरडीएकडून बाजारभावाने मिळणारा मोबदला अशा अनेक कारणांमुळे वादात असलेल्या कलिना संकुलाचा मास्टर प्लॅन नेमका अस्तित्वात येणार कधी ? विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होणार कधी ? असे प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होऊ लागले आहेत. 

एमएमआरडीएला मुंबई विद्यापीठाच्या कालिना परिसर विकासाचा मास्टर प्लान तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार विद्यापीठाच्या जमिनीचा भाग एमएमआरडीएला हस्तांतरित केल्यानंतर त्यातून मिळणाऱ्या टीडीआरमधून एमएमआरडीए विद्यापीठाच्या मान्यतेनंतर विद्यापीठाला आवश्यक विकासात्मक सोयी सुविधा निर्माण करून देणार आहे. मात्र हा विकास रखडला आहे.

विद्यापीठाच्या कालिना परिसरातील अनेक इमारती जीर्णावस्थेत असल्याने विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांसाठी नवीन बांधकामे आवश्यक होती. त्यामुळे एमएमआरडीएने बांधकामाचा मास्टर प्लॅन विद्यापीठाला विनामूल्य करून देण्याबाबत विनंती करण्यात आली. या प्रकल्पांतर्गत जमीन हस्तांतरणाच्या बदल्यात विद्यापीठाला मिळणारा टीडीआर विकण्याकरिता व मिळणारी रक्कम विद्यापीठ निधीत जमा करून इमारती व इतर सुविधांसाठी खर्च करावा असे ठरविण्यात आले. मात्र अनेक कारणांमुळे अडथळे येत राहिल्याने अंमलबजावणी दूरच, मात्र आराखडाही वेळेत सादर होऊ शकला नाही. 

सल्लागारावर काय कारवाई केली?एमएमआरडीएकडून मेसर्स डीडीएफ कन्सल्टंट याची नेमणूक केली. ४० महिने उलटूनही अद्याप कलिना संकुलाच्या विकासात हालचाल झाली नसल्याने अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला. आतापर्यंत कन्सल्टंट कंपनीसोबत झालेल्या करारापैकी ५ लाखांची रक्कम देऊनही काम का रखडले याची सरकारने चौकशी केली का? मुदतीत आराखडा सादर न केल्याने सल्लागारावर काय कारवाई केली असा प्रश्न उपस्थित केला.  

लवकरच अंतिम आराखडा   सरकारने दिलेल्या उत्तरानुसार, सामंजस्य करारानुसार सुरू असलेल्या कामांच्या संदर्भात घेतलेल्या बैठकांमध्ये मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरातील जमिनी कौशल्य विद्यापीठ, भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय आणि संग्रहालयाकरिता देण्याबाबत चर्चा झाली.   सल्लागाराकडून संकल्पनात्मक आराखडा प्राधिकरणास दोन पर्यायांसह सादर केला आहे.   मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व मुंबई विद्यापीठामार्फत यापैकी एका पर्यायाची निवड करून लवकरच अंतिम आराखडा तयार केला जाईल असे स्पष्ट केले.

एमएमआरडीएकडून कन्सल्टन्ट कंपनीही नेमण्यात आली असून १ कोटी १२ लाखांचा करारनामा झाला आहे. २०१९ पासून आतापर्यंत ४० महिने उलटूनही अद्यापही मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलाचा विकास ठप्प आणि जैसे थे आहे. 

टॅग्स :मुंबई विद्यापीठ