पनवेलच्या विकासाला येणार वेग!
By admin | Published: September 4, 2016 03:25 AM2016-09-04T03:25:52+5:302016-09-04T03:25:52+5:30
पनवेल महानगरपालिका १ आॅक्टोबरपासून अस्तित्वात येणार असल्याची अधिसूचना निघताच शहराच्या विकासाला वेग येण्याची शक्यता आहे. पहिल्या महापालिकेचे उमेदवार
- नितीन देशमुख, पनवेल
पनवेल महानगरपालिका १ आॅक्टोबरपासून अस्तित्वात येणार असल्याची अधिसूचना निघताच शहराच्या विकासाला वेग येण्याची शक्यता आहे. पहिल्या महापालिकेचे उमेदवार होण्यास इच्छुक असलेले उमेदवारही प्रचाराला लागले आहेत.
अनेक दिवसांपासून पनवेल महापालिका होण्याबाबत चर्चांना उधाण आले होते. त्यातच निवडणूक आयोगाने पनवेल नगर परिषदेची निवडणूक जाहीर केल्याने महानगरपालिका होण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र अध्यादेश जारी करण्यात आल्याने पनवेल महापालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यपालांच्या आदेशाने नगरविकास खात्याचे उपसचिव डॉ. सुधाकर शिंदे यांनी शुक्रवारी अधिसूचना काढली. अधिनियमानुसार १ आॅक्टोबरपासून महानगरपालिका स्थापन करण्याचे निर्देश आहेत.
पनवेल महापालिकेत तळोजे पाचनंद, काळुंद्रे, खारघर (मजरे बेलपाडा), ओवे, देवीचापाडा, कामोठ, छळ, नावडे, नावडे खार, तोंढरे, पेधर, कळंबोली, कोल्हेखार, आंबेतखार, रोडपली (खिडुकपाडा विभाजित गाव ), पडघे, वळवली, पाले खुर्द, टेंभोडे, आसूडगाव, खेरणे बुद्रूक, बीड, आडिवली, रोहिजण, धानसर, पिसा, तुर्भे, करवले बुद्रूक, तळोजे, घोट, कोयनावळे (घोट कॅम्प) ही ३२ गावे समाविष्ट करण्यात आली आहेत.
पनवेल महानगरपालिका व्हावी अशी १९५१पासून चर्चा सुरू होती. सिडकोच्या कारभाराला नागरिक कंटाळले आहेत. ८ ते १० वर्षांपासून पुन्हा महानगरपालिका व्हावी, या चर्चेने जोर धरला होता. लोकप्रतिनिधींनाही एकच शासन असावे असे वाटते आहे. अधिसूचना निघाल्याने आता महापालिका स्थापनेबाबतचा संभ्रम दूर झाला आहे. त्यामुळे पनवेलच्या विकासाला गती येईल, असा विश्वास भाजपाचे नेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.
१ आॅक्टोबरपासून महापालिका
राज्यपालांच्या आदेशाने नगरविकास खात्याचे उपसचिव डॉ. सुधाकर शिंदे यांनी शुक्र वार,
२ सप्टेंबर रोजी अधिसूचना काढून पनवेल महानगरपालिका १ आॅक्टोबरपासून अस्तिवात येईल, असे जाहीर केले.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार
१ आॅक्टोबरपासून महानगरपालिका स्थापन करण्याची अधिसूचना काढण्याचे सरकारचे निर्देश आहेत.