मुंबई: देखभालीसाठी दिलेले मोकळे भूखंड राजकीय नेते व त्यांच्या संस्थांच्या घशात जात असल्याचे उजेडात आले आहे़ मनोरंजन व खेळाचे मैदानासाठी पालिकेने आखलेल्या धोरणातही अशा नेत्यांचेच हित जपण्यात आले होते़ या धोरणाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे़ त्यामुळे सुधारित धोरणानुसार पालिकाच यापुढे मोकळ्या भूखंडांचा विकास आणि देखभाल करणार आहे़ यामुळे बहुतांशी भूखंड स्वपक्षीय नेत्यांच्या ताब्यात असल्याने शिवसेनेची गोची होणार आहे़मुंबईतील मोकळ्या भूखंडांच्या धोरणाला स्थगिती देण्यात आली असल्याने उद्याने, मैदाने आणि मोकळ्या भूखंडांचा विकास करण्याची गरज आहे़ संपूर्ण २४ प्रभागातील १९ कामांसाठी पालिकेने ठेकेदार नेमण्यासाठी निविदा मागविल्या आहेत़ यास ११९ ठेकेदारांनी प्रतिसाद दिला आहे़ यापैकी ११४ ठेकेदारांची यादी तयार करण्यात आली आहे़ यात अंतिम यादीमध्ये १९ ठेकेदारांचा समावेश करण्यात येणार आहे़ मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पालिकेने २१६ भूखंड संबंधित संस्थांकडून ताब्यता घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे़पालिकेच्या महासभेत मंजूर झालेले मोकळ्या भूखंडांच्या धोरणावर भाजपाने मुख्यमंत्र्यांमार्फत स्थगिती आणली़ त्यानंतर भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी आपल्या ताब्यातील भूखंड पालिकेच्या स्वाधीन करण्याची तयारी दाखवून शिवसेनेची कोंडी केली़ त्यामुळे सुधारित धोरणाला भाजपाचा पाठिंबा मिळाल्यास शिवसेना अडचणीत येणार आहे़ विरोध पक्षाच्या संख्याबळावर भाजपाने सुधारित धोरण मंजूर करुन घेतल्यास शिवसेनेची पुरती पंचाईत होणार आहे़ (प्रतिनिधी)
उद्यानांचा विकास पालिकाच करणार
By admin | Published: March 01, 2016 2:53 AM