मुंबई : विकास आराखड्याची अंमलबजावणी ही प्रत्येक २० वर्षांनी चिंतेचा विषय ठरत आहे. नियोजनावर कोट्यवधी रुपये व वेळ खर्च होऊन त्यातील शिफारशींवर १५ ते २० टक्केच अंमल होत आहे. त्यामुळे या वेळीपासून आराखडा मंजूर होण्यापूर्वीच त्यातील तरतुदींवर महापालिकेने काम सुरू केले आहे. त्यानुसार शाळांपाठोपाठ आता नवीन उद्याने, मनोरंजन मैदान, क्रीडांगण तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र या नागरी व पायाभूत सुविधांचा लाभ नागरिकांना प्रत्यक्षात कधी मिळेल, याची शाश्वती पालिकेला देता आलेली नाही.महापालिकेचा प्रस्तावित ‘प्रारूप विकास आराखडा २०३४’ हा अद्याप मंजूर झालेला नाही. या आराखड्यातील तांत्रिकदृष्ट्या मंजूर नागरी सेवा-सुविधांची अंमलबजावणी करण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. या अंतर्गत पालिकेच्या ताब्यात असलेल्या ४१ भूखंडांवर नवी उद्याने, मनोरंजन मैदाने, क्रीडांगणे विकसित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे भविष्यात मुंबईकरांना २५ नवी उद्याने, मनोरंजन मैदाने व १६ क्रीडांगणे उपलब्ध होऊ शकणार आहेत. याबाबतची निविदा प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे.उद्यान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या महापालिकेची एक हजार ४२ उद्याने, मनोरंजन मैदाने, क्रीडांगणे आहेत. यातील ३०५ भूखंडांवर क्रीडांगणे आहेत, तर उर्वरित ७३७ भूखंडांवर उद्याने, मनोरंजन मैदाने आहेत. प्रस्तावित विकास आराखड्यातील तांत्रिकदृष्ट्या मंजूर आरक्षणे विकसित करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांना २५ नवी उद्याने व खेळण्यासाठी १६ क्रीडांगणे उपलब्ध होणार आहेत.मुंबईतील उद्यानांची एकूण संख्या ७६२ तर क्रीडांगणांची संख्या ३२१ एवढी होणार आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.ओशिवरामध्ये सर्वांत मोठे मैदाननव्याने विकसित करण्यात येणारी २५ उद्याने, मनोरंजन मैदाने यापैकी सर्वात मोठे उद्यान, मनोरंजन मैदान हे ‘के-पश्चिम’ विभागातील आंबिवली, ओशिवरा परिसरातील पाच लाख २८ हजार १५४ चौरस फुटांच्या भूखंडावर असणार आहे.तर १६ क्रीडांगणांपैकी सर्वात मोठे क्रीडांगण हे मालाड परिसरातील एक लाख पाच हजार ४१६ चौरस फुटांच्या भूखंडावर प्रस्तावित करण्यातआले आहे.दोन लाख २२ हजार ४२७ चौरस फूट आकाराच्या आकुर्ली परिसरातील भूखंडावर उद्यान, मनोरंजन मैदान प्रस्तावित करण्यात आले आहे. तर माहुल परिसरातील (एम-पश्चिम) एक लाख ८९ हजार ५१७ चौरस फूट, मुलुंड परिसरातील (टी) एक लाख ४८ हजार ४८८ चौरस फूटवरही प्रस्ताव आहे.वांद्रे परिसरातील (एच-पश्चिम) एक लाख ३५ हजार ८२३ चौरस फूट, मारवली, राहुलनगर (एम-पूर्व) परिसरातील एक लाख तीन हजार ६६१ चौरस फूट आणि भांडुप परिसरातील (एस) एक लाख दोन हजार ९६९ चौरस फुटांच्या भूखंडावरदेखील उद्यान, मनोरंजन मैदान प्रस्तावित आहेत.सुमारे २१ लाख ८० हजार चौरस फुटांपेक्षा अधिक आकारमान असणाºया वेगवेगळ्या ४१ भूखंडांच्या विकासासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात करण्यात आली आहे, अशी माहिती विकास नियोजन खात्याचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी दिली.
विकास आराखडा: नवी उद्याने, मैदानांचा विकास; मंजुरीपूर्वीच तरतुदींवर महापालिकेचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 4:58 AM