मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत राज्यातील सहा ग्रामीण तिर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये टाकळघाट (नागपूर), कपिलधार (बीड), श्रीक्षेत्र राजूर गणपती मंदिर (जालना), आमला (अमरावती), श्रीक्षेत्र कोंडेश्वर (अमरावती), संत गाडगे महाराज जन्मभूमी (शेंडगाव, जि. अमरावती) या सहा ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या समावेश आहे. सरकारकडून या सहा तिर्थक्षेत्रांच्या विकासासाठी भरीव निधीही देण्यात आला आहे. त्यामध्ये ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंच्या बीड जिल्ह्यातील कपिलधार या तिर्थक्षेत्र विकासासाठी 10 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विकास आराखड्यास मंजुरी देतानाच सिंधुदूर्ग येथे बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक तसेच हिंदी पत्रकारितेचे पितामह बाबूराव विष्णूराव पराडकर यांचे स्मारक उभारण्यासही तत्वत: मंजुरी दिली. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, खासदार रावसाहेब दानवे, आमदार रवी राणा, मुख्य सचिव दिनेश कुमार जैन उपस्थित होते.
राज्य सरकारकडून बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र कपिलधारसाठी (10 कोटी), श्रीक्षेत्र राजूर गणपती मंदिर, राजूर, जि. जालना (24.98 कोटी), श्रीसंत गाडगे महाराजांची कर्मभूमी असलेले आमला व ऋणमोचन, जि. अमरावती (10.20 कोटी), श्रीक्षेत्र कोंडेश्वर, जि. अमरावती (25 कोटी), संत गाडगे महाराजांची जन्मभूमी, शेंडगाव, जि. अमरावती (18.70 कोटी) आणि नागपूर येथील श्रीक्षेत्र विक्तुबाबा देवस्थान, टाकळघाट या सहा ग्रामीण देवस्थानच्या विकासासाठी (5कोटी) रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे.