मोखाडा ग्रामीण : तालुक्यात जिल्हापरिषद विभागातील पंचायत समिती व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात येणाऱ्या शासकीय विकासकामांच्या पाट्या गायब होताना दिसत आहेत. शासकीय निधीद्वारे करण्यात येणाऱ्या कामांचे माहिती फलक लावण्याची मागणी नागरीकांकडून करण्यात येत आहे.तालुक्यात नागरीकांना योजनेची व रक्कमांची माहिती मिळत नाही त्यातच बहुतांश ठिकाणी खाजगी विकासकांकडून कामे करून शासकीय निधीचा अपहार होत असल्याचे येथील नागरीकांचे म्हणणे आहे.मोखाडा तालुक्यात आमदार निधी, खासदार निधी, ठक्कर बाप्पा योजना, जिल्हापरिषद अर्थसंकल्पीय निधी, पश्चिम घाट विकास योजनाचा निधी, सा. बा. विभागाच्या एस. आर. मधील रस्त्याचे पूल तसेच मोऱ्याच्या दुरूस्त्या या शासकीय योजनेतून सा. बा. विभाग, जिल्हापरिषद, लघुपाटबंधारे विभाग, पाणीपुरवठा विभाग यांच्यातर्फे विविध विकासकामे केली जातात. या योजनेची माहिती देण्यासाठी काम सुरू व पूर्ण झाल्यावर कामाच्या नामफलक लावणे शासन नियमानुसार बंधनकारक आहे. यामध्ये कामाचे नाव, मंजूर रक्कम व वर्ष योजना राबवणारी योजना व झालेला खर्च इ. बाबी समाविष्ट असतात. परंतु ठेकेदार आपला भोंगळ कारभार लपवण्यासाठी हे फलक लावत नसून ते लावण्याची सक्ती व्हावी अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
विकासकामांच्या पाट्या गायब
By admin | Published: September 22, 2014 12:56 AM