सीईआरच्या माध्यमातून मुंबईतील प्रकल्पांचा विकास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 01:19 AM2020-03-13T01:19:52+5:302020-03-13T01:20:07+5:30
कोरोनाविषयी जनजागृती करणार : विद्यार्थ्यांना संगणक, झोपडपट्टी सुधारणा होणार
मुंबई : सांघिक पर्यावरणीय जबाबदारी (सीईआर) अंतर्गत मुंबईत विविध प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. यामध्ये मुलुंड-पवई येथे मियावाकी पद्धतीने शहरी वनीकरण, पवई तलावाचा अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने कायाकल्प, रात्र निवारा येथील विद्यार्थ्यांना संगणक व त्यासाठी आवश्यक प्रशिक्षक शिक्षक, झोपडपट्टी सुधारणा, कोरोनाविषयी जनजागृती करणारी चित्रफीत, हरित शाळा, रेनवॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जा आदी प्रकल्पांचा समावेश आहे. हे प्रकल्प खाजगी विकासकांच्या साहाय्याने उभे राहणार आहेत. याबाबत आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत गुरुवारी हा निर्णय घेण्यात आला.
‘सीईआर’मधील तरतुदीनुसार देय असलेल्या रकमेतून कुणी कुठल्या प्रकल्पाला हातभार लावायचा, याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला प्रधान सचिव (पर्यावरण) अनिल डिग्गीकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, विशेष अभियांत्रिकी संचालक विनोद चिठोरे, आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त चंद्रशेखर चोरे तसेच एमसीएचआय, क्रेडाई, ओबेरॉय, वाधवा, मेफेअर, रहेजा, एॅक्मे, टीसीएस इत्यादींचे प्रतिनिधी उपस्थित होते. केंद्रीय पर्यावरण विभागाने १ मे २०१८ रोजी केलेल्या तरतुदीनुसार सांघिक सामाजिक जबाबदारीच्या धर्तीवर ‘सीईआर’ संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यानुसार गुरुवारी झालेल्या पहिल्या बैठकीत प्रकल्पांचे काम सीईआरच्या माध्यमातून पुढे नेण्याचे निश्चित करण्यात आले.
सीईआर अंतर्गत येणारे अनेक प्रकल्प सुरू असले तरी त्याची एकत्रित सूची तयार केलेली नाही. या प्रकल्पांच्या सीईआरमधून उपलब्ध होणाऱ्या निधीचा वापर योग्य प्रकारे व्हावा, त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होण्यासाठी एक कार्यकारी समिती सहआयुक्त (दक्षता) यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आहे. यात प्रमुख अभियंता (विकास नियोजन) हे समितीच्या उपाध्यक्षपदी असणार आहेत. तर प्रमुख अभियंता घनकचरा व्यवस्थापन, मलनि:सारण प्रकल्प, जल अभियंता, उद्यान अधीक्षक मुख्य लेखापाल (वित्त) आणि पर्यावरण विभागाचे प्रतिनिधी हे समितीचे सदस्य आहेत. या बैठकीला जिल्हाधिकारी कार्यालय, संजय गांधी उद्यान, मॅग्रोव्हज् सेल, वन विभाग व इतर तज्ज्ञांना विषयाच्या गरजेनुसार निमंत्रित केले जाणार आहे.
या प्रकल्पांना मिळणार गती
मुलुंड-पवई येथे मियावाकी पद्धतीने शहरी वनीकरण, पवई तलावाचा अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने कायाकल्प, रात्र निवारा येथील विद्यार्थ्यांना संगणक व त्यासाठी आवश्यक प्रशिक्षक शिक्षक, झोपडपट्टी सुधारणा, कोरोनाविषयी जनजागृती करणारी चित्रफीत, हरित शाळा, रेनवॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जा आदी प्रकल्पांच्या कामाला गती मिळणार आहे.