Join us

बोरिवली पूर्व, भायखळ्यातील विकासकामांवर २४ तासांत बंदी, पुढील तीन-चार दिवस हवेच्या दर्जाचे निरीक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 12:39 IST

काही दिवसांपासून मुंबईच्या हवेचा दर्जा खालावत असून प्रदूषणात भर पडत आहे. पालिका आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळा (एमपीसीबी)कडून प्रदूषण नियंत्रणासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. 

मुंबई : काही दिवसांपासून बोरिवली पूर्व आणि भायखळ्यातील हवेचा दर्जा ‘वाईट श्रेणीत’ असल्याने महापालिकेने येत्या २४ तासांत तेथील सर्व प्रकारची खासगी, शासकीय बांधकामे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील ३ ते ४ दिवस या भागातील हवेच्या दर्जाचे निरीक्षण केले जाईल आणि त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सोमवारी दिली.  काही दिवसांपासून मुंबईच्या हवेचा दर्जा खालावत असून प्रदूषणात भर पडत आहे. पालिका आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळा (एमपीसीबी)कडून प्रदूषण नियंत्रणासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात पुढील कारवाईची माहिती देण्यासाठी सोमवारी पालिका मुख्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी आयुक्त भूषण गगराणी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य- सचिव अविनाश ढाकणे, अतिरिक्त पालिका आयुक्त विपिन शर्मा आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी उपस्थित होते. बोरिवली पूर्व आणि भायखळ्याप्रमाणे नेव्हीनगर आणि वरळी येथील हवेच्या दर्जाचे ३ ते ४ दिवस निरीक्षण केले जाईल. तेथील हवेचा दर्जा वाईट श्रेणीत आढळल्यास तेथील बांधकामे बंद करावी लागतील, असा इशारा गगराणी यांनी दिला. ज्या भागातील हवेचा दर्जा वाईट श्रेणीत आहे तिथे एमपीसीबी आणि सहपोलिस आयुक्त यांच्यासह संयुक्त कारवाई केली जाईल, असेही आयुक्तांनी सांगितले.

२८६ ठिकाणचे काम थांबवण्याची नोटीस मुंबईतील वाहतूक कोंडी आणि बांधकामे ही मुंबईच्या प्रदूषणाची मुख्य कारणे आहेत. त्यामुळे पालिकेकडून धूळ, धूर प्रदूषणावर नियंत्रणासाठी २८ मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. प्रकल्प आणि बांधकाम विकासक, कंत्राटदारांना पर्यावरण व्यवस्थापन योजना (ईएमपी) सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. पालिकेच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाने नोव्हेंबरपासून आजपर्यंत ८७७ बांधकाम प्रकल्पांची पाहणी केली असून शहर व उपनगरात २८६ ठिकाणी काम थांबविण्याची नोटीस देण्यात आली आहे.

बोरिवली पूर्व आणि भायखळा भागातील विकासकांनी बांधकामे थांबवली नाहीत तर एमआरटीपी (महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम) कायद्याच्या कलम ५२नुसार कारवाई करण्यात येईल.     - भूषण गगराणी,     आयुक्त, मुंबई महापालिका

मुंबई एअर ॲपवर तक्रारी -     मुंबई एअर ॲपवर ४१२ तक्रारी आल्या आहेत. यापैकी ३५० तक्रारींचा निपटारा पालिकेने केला आहे. -     २६ तक्रारी पालिका कार्य क्षेत्राबाहेरील असल्याचे सांगण्यात आले. इतर ३६ तक्रारींवर पालिकेची कार्यवाही सुरू आहे.  

पालिका क्षेत्रात २८ मॉनिटरिंग सिस्टम कार्यरतपालिका क्षेत्रात पालिका, एमपीसीबी आणि आयआयटीएम या यंत्रणांची एकूण २८ मॉनिटरिंग स्टेशन्स आहेत.  त्याद्वारे रियल टाइम हवेची गुणवत्ता मोजली जात आहे. त्यातून कोणत्या ठिकाणी किती वायुप्रदूषण आहे हे ओळखता येते आणि योग्य उपाययोजना करणे शक्य होते. यांतील १४ संयंत्रे एमपीसीबी, ९ आयआयटीएम, तर ५ पालिकेची आहेत. एमपीसीबीकडून या संयंत्रात वाढ केली जाण्याची माहिती अविनाश ढाकणे यांनी दिली.

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका