Devendra Fadanvis: देशाच्या शत्रुला मदत करणाऱ्यांची गय केली जाऊ नये, फडणवीसांचा थेट प्रहार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 09:34 PM2022-02-23T21:34:59+5:302022-02-23T22:29:21+5:30
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींचे बयान ईडीने कारागृहात जाऊन घेतलेले आहेत. देशाच्या शत्रूला मदत करणार्यांची गय केली जाऊ नये.
मुंबई - विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची घोषणा केली होती. दिवाळीनंतर ९ नोव्हेंबर मंगळवारी दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांनी बॉम्ब फोडला. या पत्रकार परिषदेकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांचा नकाब फडणवीसांनी उघड केला होता. त्यानंतर आज नवाब मलिक यांना ईडीने आठ तासांच्या चौकशीअंती अटक केली असून 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी फडणवीस यांनी दिवसभरात प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींचे बयान ईडीने कारागृहात जाऊन घेतलेले आहेत. देशाच्या शत्रूला मदत करणार्यांची गय केली जाऊ नये. माझ्याकडे जितके पुरावे होते, ते मी सर्व यंत्रणांना दिले होते. मंत्र्यांचा राजीनामा घेणार नसतील, तर राजकारणाचा स्तर खालावेल, अशा शब्दात फडणवीस यांनी मलिक यांच्या अटकेनंतर सराकारने घेतलेल्या भूमिकेवरुन टीका केली आहे. तसेच, देशाच्या शत्रूला मदत करणारे मंत्रिमंडळात राहतात, पूर्ण सरकार त्याच्या पाठिशी उभे राहते, याचा देशात संदेश चांगला जाणार नाही. महाविकास आघाडी सरकार कसे खोटे पुरावे, साक्षी गोळा करतात, यासंदर्भात येत्या काही दिवसांत मोठा खुलासा करणार असल्याचा इशाराही फडणवीस यांनी दिला आहे.
महाविकास आघाडी सरकार कसे खोटे पुरावे, साक्षी गोळा करतात, यासंदर्भात येत्या काही दिवसांत मोठा खुलासा करणार: देवेंद्र फडणवीस@Dev_Fadnavis
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) February 23, 2022
फडणवीसांनी केला होता आरोप
फडणवीसांनी दिवाळीनंतरच्या पत्रकार परिषदेत म्हटले होते की, १९९३ बॉम्ब स्फोटातील जन्मठेप लागलेल्या दोषी आरोपी आणि दाऊदच्या साथीदाराकडून नवाब मलिकांच्या कुटुंबियांच्या नावाने कुर्ल्यातील एलबीएस मार्गावरील ३ एकर जमीन कवडीमोल भावाने खरेदी केल्याचा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला होता. सरदार शाहवली खान आणि सलीम पटेल अशी अंडरवर्ल्डच्या या गुंडांची नावे आहेत.
8 दिवसांची ईडी कोठडी
अंमलबजावणी संचलनालयाने नवाब मलिक यांना आठ तासांच्या चौकशीनंतर अटक केली आहे. सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात नवाब मलिक यांना हजर केले. ईडीने १४ दिवसांची नवाबांची कोठडी पाहिजे म्हणून युक्तिवाद केला. मात्र, न्यायालयाने नवाब मालिकांना आठ दिवसांची ईडीची कोठडी सुनावली आहे. आता नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत राहावे लागणार आहे.