नागपूर/ मुंबई - शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर सोमवारी नव्या शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाण्यात जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही नागपूरमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. तर, इतरही बंडखोर आमदार त्यांच्या मतदारसंघात गेले. नागपुरात, फडणवीसांच्या स्वागताला भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. नागपूरचे दुसरे सुपुत्र आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे आज नागपूर विमानतळावर देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं.
देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात जल्लोषात स्वागत झालं, त्यांच्यासह पत्नी अमृता फडणवीस याही उपस्थित होत्या. नागपूर विमानतळावरून देवेंद्र फडणवीस यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. नागपूरकरांना आमच्यावर नेहमीच प्रेम केले आहे. आज उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा आलो असता प्रेम व्यक्त करण्यासाठी लोक जमले. मी त्यांचे मनापासून आभार मानतो. मी जे काही आहे ते त्यांच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे आहे. आपल्यावर एक मोठी जबाबदारी आपल्यावर आहे याची मला जाणीव आहे. ती योग्य प्रकारे पार पडण्याचा संकल्प आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. त्यानंतर, आज नितीन गडकरी यांच्या स्वागतासाठी ते नागपूर विमानतळावर पोहोचले.
शिवरायांच्या गनिमी काव्याने नवे सरकार
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने नवे सरकार आणले आहे. गेल्या अडीच वर्षांत खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला. नेमके कोण राज्य चालवत होते, तेच समजत नव्हते, अशी टीका करताना, सर्वोच्च न्यायालयात आम्ही योग्य ती बाजू मांडू. आम्ही योग्य काम केले असल्याने योग्य निकाल येईल. पण आता न्यायालयावर टिप्पणी करणे अयोग्य ठरेल. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.