Devendra Fadanvis: फडणवीसांनी दिवाळीनंतर फोडला होता बॉम्ब, मलिकांच्या अटकेनंतर भाजपनं दिला दाखला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 07:31 PM2022-02-23T19:31:11+5:302022-02-23T19:53:33+5:30
मलिक यांच्या अटकेवर अद्याप देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन कुठलिही प्रतिक्रिया दिली नाही.
मुंबई - नवाब मलिक यांनी क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात शाहरुख खानच्या मुलाच्या बचावासाठी पुढे येत भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला होता. केंद्र सरकारवर आरोप करत ईडीसारख्या तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावेळी, मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. त्यास, फडणवीस यांनी त्यावेळीच पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तरही दिलं. तसेच, मलिक यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित गुंडांकडून जमिन खरेदी केल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला होता. मलिक यांच्या अटकेनंतर आता तो मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे.
मलिक यांच्या अटकेवर अद्याप देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन कुठलिही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, त्यांनी मलिकांवर केलेल्या आरोपांमुळेच त्यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची चर्चा रंगली आहे. क्रूझवरील ड्रग्स पार्टीवरून (Cruise Drug Party) एनसीबी विरुद्ध एनसीपी असा संघर्ष सुरू असताना भाजपमधील नेत्यांचे ड्रग्ज पेडलरशी संबंध असल्याचा आरोप करत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि त्यांच्या पत्नी अमृता (Amruta Fadnavis) यांच्यावरच गंभीर आरोप केले होते. त्या आरोपांना फडणवीस दाम्पत्यानं प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर, फडणवीस आणि मलिक यांच्याच शाब्दीक युद्ध सुरू झालं. त्यावेळी, हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचं मलिक यांनी म्हटलं होतं. मात्र, दिवाळीआधी मलिक यांनी लवंगी लावली. दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडेन, असा सूचक इशारा फडणवीसांनी दिला होता.
नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांचं ते विधान चर्चेत आलं आहे. एका भाजप नेत्यानं फडणवीसांचं त्या विधानाची बातमी शेअर करत मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. बुलढाणा जिल्ह्याचे भाजपा अध्यक्ष आणि खामगांवचे आमदार आकाश फुंडकर यांनी हे ट्विट केलं आहे. त्यामध्ये, 'मंत्री नवाब मलिक यांनी 93 च्या बॉम्बस्फोटातील दोषींशी व्यवहार केला होता', असे फुंडकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मलिक यांना ईडीने सकाळी ताब्यात घेतल्यानंतर चौकशीअंती त्यांना अंमलबजावणी संचलनालयाकडून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर, सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात नवाब मलिक यांना हजर केले असून सुनावणी सुरू झाली. मलिक यांना १४ दिवसांच्या कोठडीची मागणी ईडीने कोर्टाकडे केली आहे. तसेच, नवाब मलिक यांचे वकील अमित देसाई यांनी कोर्टात सांगितले की, मला समन्स न देता बोलावले आहे आणि ईडीने मला घरीच ताब्यात घेतले.