मुंबई - राज्य सरकारने भोंग्यासंदर्भात बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीला भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाठ फिरवल्यानंतर दुपारी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी, नवनीत राणा, हनुमान चालिसा, शरद पवार, मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेंचा आजी दौरा यांसह विविध विषयांवर भाष्य केलं. महाराष्ट्रात जणूकाही यांनी युद्धच जिंकलं आहे, अशा अविर्भावात ते आजीच्या भेटीला गेल्याचं फडणवीस यांनी म्हटलं. तसेच, या भेटीवरुन मुख्यमंत्र्यांवर टिकाही केली.
आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले होते. राणा यांना रोखण्यासाठी हजारो शिवसैनिक मातोश्री निवासस्थानी जमले होते. दरम्यान, या शिवसैनिकामध्ये एका ८० वर्षांच्या आजींनी लक्ष वेधून घेतले होते. 'झुकेगा नही' म्हणत या आजींनी केलेल्या आंदोलनाची दखल खुद्द मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी घेतली. मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब या आजींची घरी जाऊन भेट घेतली होती. या भेटीवरून मनसेनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला होता. आता, देवेंद्र फडणवीस यांनीही या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला आहे.
हनुमान चालिसा महाराष्ट्रात नाही, तर मग काय पाकिस्तानात जाऊन म्हणायची का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. तसेच, ''आणि मग काय कुठल्या आजीकडं मुख्यमंत्री जातात. जणूकाही ते मोठं युद्ध जिंकले आहेत. अरे, एसटी संपातील आत्महत्याग्रस्त कर्मचाऱ्याच्या घरी गेले असता, एखाद्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरी गेले असता तर समजलं असतं,'' असे म्हणत फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या आजी भेटीवर टिका केली. तसेच, आजीकडे गेल्यावर आजीने काय सुनावलं हे आपण सगळ्यांनी बघितलंय, त्यांनी कुठे जावं हा त्यांचा संबंध आहे, त्यावर मला अधिक बोलायचं नाही, असेही फडणवीस यांनी म्हटलं.
नवनीत राणांवर राजद्रोहाचा गुन्हा का?
एखाद्या महिला खासदाराला नामोहरम करण्यासाठी पहिल्या दिवशी रिमांडमध्ये वेगळं सेक्शन आणि दुसऱ्यादिवशी सीडीसी, राजद्रोहाचं सेक्शन. म्हणजे हनुमान चालिसा म्हटल्याने यांचं राज्य उलटवलं असा कटं होतो, यापेक्षा हास्यास्पद काय असू शकतं. हनुमान चालिसा म्हणणं महाराष्ट्रात राजद्रोह होत असेल तर तो आम्ही दररोज करू, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी चक्क हनुमान चालिसाच म्हणून दाखवली. तसेच, तुरुंगात नवनीत राणा यांना अत्यंत हिन दर्जाची वागणूक दिल्याचा दावाही त्यांनी केला. तुरुंगात पाणी प्यायला दिलं नाही, तर वॉशरुमलाही जायला परवानगी दिली नाही. अत्यंत वाईट पद्धतीने त्यांना वागवलंय. राणा यांनी लोकसभा सभापतींकडे यासंदर्भात तक्रार केल्याचंही फडणवीसांनी सांगितलं.