Join us

Devendra Fadanvis: बरोबर ना ताई?, 'अकेला देवेंद्र क्या करेगा' म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंना भाजप नेत्याचा टोमणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2022 9:26 PM

देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या वादानंतर मंत्री नवाब मलिक यांच्या घरी ईडीने धाड टाकली.

मुंबई - राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चहापानाच्या दिवसांपासून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरुन भाजप नेते आक्रमक झाले होते. तर, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा संबंध थेट दाऊद इब्राहिमसोबत जोडला. हे सरकार दाऊदच्या माणसांशी आर्थिक व्यवहार माणसांना वाचविण्याचं काम करतंय, असा आरोप केला. त्यानंतर, दररोज फडणवीस आक्रमक होताना दिसत आहेत. त्यावरुन, भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी सुप्रिया सुळेंची खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या वादानंतर मंत्री नवाब मलिक यांच्या घरी ईडीने धाड टाकली. त्यानंतर, त्यांना अटक करण्यात आली. त्यावरुन, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्यातील पोलीस यंत्रणांकडून होणाऱ्या मुस्कटदाबीचा मुद्दा ऐरणीवर घेतला. त्यावरुन, विधानसभेत महाविकास आघाडी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. देवेंद्र फडणवीस एकटेच महाविकास आघाडीच्या नेत्यांना, मंत्र्यांवर हावी होताना दिसत आहेत. त्यावरुनच, आमदार नितेश राणे यांनी एक ट्विट करुन राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळेंना लक्ष्य केलंय. अकेला फडणवीस क्या करेगा... असे प्रश्नार्थक वाक्य लिहून... बरोबर ना ताई... असे म्हणत सुप्रिया सुळेंना लक्ष्य केलंय.    खोट्या तक्रारी करून खोटे साक्षीदार उभे करून विरोधकांना गोत्यात आणण्यासाठी कुभांड रचलं गेलं. विशेष सरकारी वकिलाच्या कार्यालयात विरोधकांच्या विरोधात कट शिजवण्यात आला. या प्रकरणात एफआयआर सरकारी वकिलांनीच लिहून दिला आणि साक्षीदारही दिला. या सगळ्या संभाषणांचे व्हिडीओ माझ्याकडे आहेत. तब्बल सव्वाशे तासांचं फुटेज आहे. त्यावर २५ ते ३० भागांची वेब सीरिज निघेल आणि हे सगळं सत्य घटनेवर आधारित आहे, असा दावा फडणवीसांनी केला.

तेव्हा सुप्रिया सळेंनी म्हटलं होतं

देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुप्रिया सुळेंनी यापूर्वी जोरदार शब्दांत निशाणा साधला होता. 'पवार साहेबांनी आता निवृत्त व्हावं, असं मार्गदर्शन फडणवीसांनी केलं होतं. मात्र, महाराष्ट्राला ते मान्य नव्हतं. त्यामुळेच 'एक देवेंद्र फडणवीस क्या करेगा! महाराष्ट्र एक तरफ और देवेंद्र फडणवीस दूसरी तरफ', असे चित्र महाराष्ट्रात दिसले अशी टोलेबाजी सुप्रिया यांनी केली होती. फडणवीस म्हणतात म्हणून पवारसाहेब निवृत्त होतो असे म्हणतीलही पण महाराष्ट्राच्या मनात तसं नाहीय, असेही त्यांनी नमूद केले. सुप्रिया सुळेंच्या याच विधानावरुन नितेश राणेंनी ट्विट करुन निशाणा साधला आहे.

राज्यातील पोलीस यंत्रणेचा गैरवापर- फडणवीस

पोलिस दलाचा गैरवापर होतो आहे. विरोधक संपवायचे षडयंत्र जर सरकार करेल, तर लोकशाही धोक्यात येते. माझ्यासह, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, जयकुमार रावल, चंद्रशेखर बावनकुळे, सुभाष देशमुख, हे भाजपाचे नेते राज्य सरकारच्या टार्गेटवर आहेत. त्यांच्या फाईल तयार आहेत, असे संभाषण झाल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांना संपवण्याचा साहेबांचा मानस आहे, असे विधानही संभाषणाता केल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

टॅग्स :सुप्रिया सुळेदेवेंद्र फडणवीसमुंबईनीतेश राणे भाजपा