मुंबई - महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि भाजप यांच्यात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरूच असल्याचे दिसत आहे. यात आता नव्या मुद्द्याची भर पडली आहे. अलीकडेच एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीचा प्रस्ताव दिला. यानंतर आता राजकीय वर्तुळात पुन्हा नव्या चर्चांना उधाण आले आहे. जलील यांच्या प्रस्तावानंतर राज्यात राजकारणाची नवी समीकरणे जुळणार का अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र, मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दात नकार दिला. त्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेवरुन टीका केली आहे.
एमआयएमने दिलेल्या युतीच्या प्रस्तावाबाबत महाविकास आघाडीतील मोठा आणि महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने आपली प्रतिक्रिया दिली आहे. खुद्द मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी एमआयएमचा प्रस्ताव फेटाळून लावत भूमिका स्पष्ट केली आहे. तरीही इम्तियाज जलील यासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचीही भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. यातच आता येत्या २२ मार्चपासून शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान सुरू होणार आहे. यांसदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला, तसेच भाजपला लक्ष्य केलं. त्यानंतर, पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली. त्यावर, खरंच मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली? असा सवाल केला. तसेच, मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेत नाहीत, असेही ते म्हणाले.
शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान
भाजपचे हिंदुत्व हे केवळ राजकारणासाठी आहे. सत्तेसाठी मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत गेले होते हे विसरलात का? असा सवाल करत, सरकारचा संबंध दाऊदशी जोडणे चुकीचे असून विरोधकांच्या कुरापती ओळखायला शिका, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे खासदार आणि जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. येत्या २२ मार्चपासून शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान सुरू होणार आहे. या अभियानांतर्गत शिवसेनेचे खासदार आणि जिल्हाप्रमुख गावागावात जाऊन शिवसेनेची बांधणी करणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.