मुंबई - हिंदुत्व विचाराच्या रक्षणासाठी राज्यात सत्ता परिवर्तन झाले असून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार भाजपसोबत आले आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पनवेल येथे भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीत सांगितले. तसेच, महाविकास आघाडी सरकारच्या काळात निर्माण झालेला विकासाचा अनुशेष त्वरेने पूर्ण करून महाराष्ट्राला देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर, मुख्यमंत्री शिंदेंच्या धाडसाचं कौतुक करत एकनाथ शिंदे हे मर्द मराठा आहेत, अशा शब्दात त्यांनी एकनाथ शिंदेंवर स्तुतीसुमने उधळली. खासदार श्रीकांत शिंदेंनी फडणवीसांचा हा व्हिडिओ शेअर केला आहे.
भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीत कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण करताना फडणवीसांनी राज्यातील सत्तांतर आणि त्यासाठी शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी घेतलेली भूमिका यासंदर्भात भाष्य केलं. यावेळी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, प्रदेश प्रभारी सी.टी.रवी, सह प्रभारी ओमप्रकाश धुर्वे व जयभान पवैय्या, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रदेश सरचिटणीस आ. श्रीकांत भारतीय आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
महाविकास आघाडी सरकारने वारंवार हिंदुत्ववादी विचारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करायचा आणि दाऊदच्या विचारांचा बचाव करायचा असे प्रकार सहन न झाल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितलं. फडणवीसांचा मेळाव्यातील या भाषणाचा व्हिडिओ एकनाथ शिंदेंचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी ट्विटरवरुन शेअर केला आहे. तसेच, एक हिमतीच मर्द मराठी, छत्रपतींचा मावळा असं कॅप्शनही त्यांनी दिलं आहे.
शिवसेनेनंच आधीच ठरलं होतं
याचबरोबर, भाजपा नेतृत्वाने कधीही अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला नव्हता.फक्त सत्तेसाठी त्यांनी जनादेशाचा अपमान केला. कारण काँग्रेस -राष्ट्रवादी बरोबर जायचे त्यांनी आधीच ठरवले होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी चालवत आहेत.हीच खरी शिवसेना आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवून मी सरकारबाहेर राहून पक्षाचे कार्य करण्याचे ठरवले होते. परंतु, पक्षाने मला सरकारमध्ये सहभागी होण्याचा आदेश दिला. मी तो पाळला. पक्षाचा आदेश माझ्यासाठी सर्वोच्च आहे. पक्षाने दिलेला आदेश पाळणे हा माझ्या दृष्टीने कृतकृत्यतेचा क्षण होता, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आम्ही ओबीसी आरक्षण परत मिळवले
राजकीय इच्छाशक्ती नसल्याने महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण घालवले. आम्ही तातडीने आवश्यक कार्यवाही करून हे आरक्षण परत मिळवले. मराठा आरक्षण विषयही आम्ही मार्गी लावू. विकासाचा कार्यक्रम धडाक्याने राबवू. नव्या सरकारने सत्तेत आल्या आल्या अनेक निर्णय घेतले. पेट्रोल, डिझेल स्वस्त केले. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद चे धाराशिव असे नामांतर केले, नवी मुंबई विमानतळाला दि .बा. पाटील यांचे नाव दिले, स्वच्छ महाराष्ट्र अभियान साठी १२ हजार कोटींची तरतूद केली, गणेशोत्सव, दहीहंडी वरील निर्बंध उठवले, समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी निविदा काढली गेली, आरे कारशेड वरील बंदी उठवली, वारकऱ्यांना टोल माफी दिली, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.