मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांची वीज बंद केल्याने शेतकऱ्यांनी राज्यभर आक्रोश व्यक्त केला आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरुन महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला. सरकारच्या या निर्णयामुळे एका शेतकऱ्याने फेसबुक लाईव्ह येऊन आत्महत्या केली. आज विधानसभेत याचे पडसाद पाहायला मिळाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पंढरपूरच्या सुरज जाधव या शेतकऱ्यानं मांडलेली व्यथा वाचून दाखवली. तसेच, तात्काळ शेतीपंपासाठी वीजपुरवठा सुरू करण्याची मागणीही केली.
सध्या ग्रामीण भागात शेतीपंपाची वीजतोडणी मोहिम वेगात सुरू आहे. या वीजतोडणीमुळे शेतातील उभी पिके जळून जात आहेत. या वीज तोडणी व महावितरणच्या मनमानी कारभाराला कंटाळून पंढरपूर तालुक्यातील एका युवा शेतकऱ्याने मरणापूर्वी फेसबुक लाईव्हद्वारे व्हिडिओ करून आपलं आयुष्य संपविल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी घडली आहे. या घटनेवरुन देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सराकरला लक्ष्य केलं. तसेच, उपमुख्यमंत्र्यांचं ऊर्जामंत्री ऐकत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
दररोज आपण शेतकऱ्याची वीज कापतो, असे म्हणत फडणवीस यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले. तसेच, तुम्ही दर अधिवेशनात वीजपुरवठा सुरूच ठेवण्याची घोषणा करता. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री आदेश देतात आणि ऊर्जा मंत्री ऐकत नाही. त्यामुळे, शेतकऱ्यांवर ही वेळ येत आहे. आज एक सुरज जाधव फेसबुक लाईव्हद्वारे आत्महत्य करतो, याला सरकारच जबाबदार असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं. तसेच, वीज तोडणी तत्काळ थांबवावी, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, वीज तोडणीचा पंढरपूर तालुक्यात पहिला बळी गेला आहे. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाला कंटाळून व वारंवार वीज तोडणी करून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या महावितरण वर वैतागून परत शेतकरी जन्माला येणार नाही, असे म्हणून पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील तरुण सूरज जाधव यांनी आत्महत्या केली.