Join us

Devendra Fadanvis: ST संपातील भुकेल्यांना 5 महिने अन्न दिलं, सदावर्तेंकडून फडणवीसाचं कौतूक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2022 10:17 AM

कामगारांचे वकिल सदावर्ते यांनी कोर्टातून बाहेर येताच माध्यमांशी संवाद साधला.

मुंबई - गोरगरिबांची लालपरी गेली पाच महिन्यांपासून बंद असल्याने सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहेत. मात्र, आता मुंबई उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन आणि ग्रॅच्युएटी देण्याचे आणि कर्मचाऱ्यांवर कुठलिही कारवाई न करण्याचे निर्देशही न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. हायकोर्टाच्या या निर्णयाचे कामगारांचे वकिल अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी स्वागत केले. तसेच, ही मोठी उपलब्धी असल्याचे सांगत संपावेळी मदत करणाऱ्या सर्वांचे आभारही मानले. 

कामगारांचे वकिल सदावर्ते यांनी कोर्टातून बाहेर येताच माध्यमांशी संवाद साधला. उच्च न्यायालयात झालेल्या दोन्ही बाजुंची माहिती त्यांनी दिली. तसेच, एसटी संपात सहभागी असलेल्या आझाद मैदानातील कामगारांना गेल्या 5 महिन्यांपासून भोजन देणाऱ्यांचे कौतूक आणि अभिनंदन केले. 

''कष्टकरी उपाशी मरत होते 5 महिने, उद्धव ठाकरे सरकारने ज्यांना विचारलं नाही, ज्यांनी भुकेला अन्न दिलं, राजकारण नाव असं समजू नये. चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, नवनीत राणा, धोंडे, अनुराधा पौडवाल यांनी 5 महिने अन्न दिलं, त्यांचं खरोखर मी कौतुक करतो. त्यांचं मी अभिनंदन करतो, आभार मानणार नाही, कारण पोटाची भूक त्यांनी भागवलेली आहे, असे सदावर्तेंनी म्हटले. दरम्यान, शरद पवार, अजित पवार यांच्यामुळे 138 मृत्यू झाले, त्यांच्यावर जातीच्या राजकारणाचे आरोप झाले, आज त्यांचा क्लिन बोल्ड केला, आज न्यायालयाने आरसा दाखवला, असेही ते म्हणाले.  

आमची मोठी उपलब्धी - सदावर्ते

''आम्ही राज्य सरकारचं 25 मार्च रोजीचं सर्क्युलर दाखवलं. न्यायालयात सांगितलं की, सरकारच्या या परिपत्रकानुसार 25 ते 30 वर्षे जरी नोकरी केली, त्यांना आता नवनियुक्ती देण्यात येणार होती. त्यावर, न्यायाधीशांनी हे चालणार नाही असं सांगितलं.'' त्यामुळे, ही मोठी उपलब्धी असल्याचं अॅड. गुणरत्न सदावर्तेंनी म्हटलं. 

न्या. संदीप शिंदे प्रकरणाचा दाखला

न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या आदेशाचा दाखलही त्यांनी दिला. सन 2017 मध्ये महामंडळ हे सरकार आहे, त्यामुळे सरकारप्रमाणेच या कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे, असे न्यायाधीश संदीप शिंदेंनी सांगितले होते. म्हणून, हे निरीक्षणात घेत असून 7 व्या वेतन आयोगासंदर्भातही स्पीड याचिका दाखल करता येईल, याचे निर्देश देऊ, असे न्यायालयाने म्हटल्याचे वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं. दरम्यान, एसटी कामगारांच्या संपाची ही मोठी उपलब्धी असून संध्याकाळपर्यंत निर्णय घेऊ, असेही सदावर्तेंनी स्पष्ट केलं.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसचंद्रकांत पाटीलएसटी संपमुंबई