मुंबई - राज्याच्या राजकारणात एकापाठोपाठ एक मोठे ट्विस्ट निर्माण झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिंदेंपाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना सरकारमधून बाहेर राहण्याची इच्छा होती. मात्र, वरिष्ठ नेत्यांच्या आणि पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. भाजप समर्थकांमध्ये काहीशी नाराजी पसरली असली तरी, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनीही सरकारमध्ये सहभागी व्हावं असे निर्देश भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतले. त्यामुळे जे. पी नड्डा यांच्या आदेशाचा मान राखत फडणवीस यांनी मोठे मन दाखवले आणि सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. त्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची आणि देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपदाची गोपनियतेची शपथ दिली. राजभवनात हा छोटेखानी शपथविधी सोहळा झाला. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशिर्वादाने मी ही शपथ घेतो, अशी सुरुवात करत शिंदे यांनी शपथ घेतली.