Join us

Devendra Fadanvis: 'सौभाग्यवतींना राबडी देवी म्हटलं तर 25 पोलीस कार्यकर्त्याच्या घरी गेले'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 1:41 PM

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधला.

नवी दिल्ली - बाबरी मशीद पडल्यानंतर देशात शिवसेनेची लाट होती. तेव्हाच आपण सीमोल्लंघन केले असते, तर आज दिल्लीत पंतप्रधानपद शिवसेनेकडे असते, असे सांगत दिल्ली काबीज करण्याचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आली आहे, असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी व्यक्त केला. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्त्वावरुन भाजपाला टोला लगावला. तसेच, ईडी, सीबीआयच्या कारवाईवरुनही फटकारले. आता, देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या टिकेला प्रत्युत्तर दिलंय. 

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधला. यापुढे महाराष्ट्रासोबतच इतर राज्यातील निवडणुका लढवायच्या आणि जिंकायच्या. कारण हाती बळ असेल तरच एकहाती सत्ता स्थापन करता येईल, असे ते म्हणाले. तसेच, ईडीच्या आडून पीडा लावण्यात शौर्य नाही, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला. त्यावर, फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून होत असलेल्या सत्तेच्या गैरवापराबद्दल सांगितलं. 

ईडी किंवा सीबीआय हे जेव्हा तुम्ही चोऱ्या कराल, तेव्हाच ते काम करेल. इकडे राज्यात तुम्ही वापरताय ना, आम्ही एखादं ट्विट केलं तरी आमच्या लोकांना जेलमध्ये टाकताय. राबडी देवी ही काय शिवी आहे का?, तर सौभाग्यवतींना राबडी देवी म्हटल्यामुळे पुण्यातले 25 पोलीस रात्री आमच्या कार्यकर्त्याच्या घरात जातायंत. आम्ही काय समर्थन नाही केलं, म्हणूनच शिवसेनेकडून रडीचा गेम खेळला जात असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं.  

ईडीवरुन काय म्हणाले होते उद्धव ठाकरे 

अमित शहा म्हणाले की हिंमत असेल तर एकट्याने लढा. पण, आव्हान द्यायचे आणि इडीची पीडा लावायची हे शौर्य नाही. वापरायचे व फेकून द्यायचे ही भाजपची नीती आहे. भाजपने विश्वासघात केल्याच्या आरोपाचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

२५ वर्षे युतीत सडली

वेगवेगळ्या लाटा येतात. सध्या कोरोनाच्या लाटांमागून लाटा येत आहेत तर मग शिवसेनेची लाट का येऊ शकत नाही? २५ वर्षे युतीत सडल्यानंतर आम्ही भाजपला सोडले, हिंदुत्वाला नाही. भाजपचे हिंदुत्व पोकळ आहे. त्यांची एका राज्यात एक भूमिका तर दुसऱ्या राज्यात वेगळी भूमिका असते.

हे नवहिंदुत्ववादी...

भाजपला आपण पोसले. पण आपली २५ वर्षे युतीत सडली, या मतावर मी आजही ठाम आहे. भाजपने सत्तेसाठी हिंदुत्वाची कातडी पांघरली आहे. सत्तेसाठी एका राज्यात गोवध बंदी आणि दुसरीकडे नाही, अशी दुटप्पी भूमिका ते घेतात. हिंमत असेल तर देशभर एकच धोरण घेऊन पुढे चला, असे आव्हानही ठाकरे यांनी दिले.  

टॅग्स :देवेंद्र फडणवीसशिवसेनाउद्धव ठाकरे