मुंबई - मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यातील भाषणानंतर उत्तर सभा घेत राज्य सरकार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टिका केली. त्यानंतर, घोषणा केल्याप्रमाणे 1 मे रोजी औरंगाबादेत त्यांची जाहीर सभा होत आहे. तर, भाजपकडूनही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार, मुंबईतील सोमय्या मैदानावरुन फडणवीस यांनी आज महाराष्ट्राला संबोधित केले. बुस्टर डोसच्या भाषणावेळी सुरुवातीला फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. बाबरी मस्जिद पाडताना मी तिथंच होतो, असे ठणकावून फडणवीसांनी सांगितलं.
फडणवीस बोलताना म्हणाले की, परवा ते म्हणाले बाबरी आम्ही पाडली, तेव्हा तुम्ही कुठं होतात. मी अभिमानाने सांगतो हा देवेंद्र फडणवीस तेव्हा तिथेच होता. मी त्याला मस्जीद मानतच नाही, तो ढाचा होता. तो ढाचा पाडण्याचं काम आम्ही केलं. तुम्हीच सांगा तो ढाचा पडला तेव्हा तुम्ही कुठं होतात? हा देवेंद्र फडणवीस ढाचा पाडण्यासाठी त्याच ठिकाणी होता. 18 दिवस सेंट्रल जेलमध्ये हा देवेंद्र फडणवीस होता, असे म्हणत फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, भोंगा काढायला सांगितलं तर तुमची फाटली आणि आम्हाला बाबरीचं सांगता?, असे म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
सन 1993 मध्ये बाबरी ढाचा आम्हीच पाडला. 30 वर्षे बाबरी पाडल्याचा आरोप ज्यानी सहन केला त्यात भाजपचे 32 नेते होते. लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, जयभानसिंग पवय्या अशी नावेच वाचून दाखवली. ज्यावेळी, बाबरी पाडली तेव्हा एकच ठरलं, हे काम आपण केलंय असं सांगायचं नाही. तर, हे कारसेवकांनी केलेलं हे काम असल्याचं सर्वांनी सांगितलं. तत्कालीन मुख्यमंत्री कल्याणसिंगांनी गोळी चालवली नाही तेव्हा ते म्हणाले, साडे तीन लाख कारसेवकांवर मी गोळी कशी चालवू?, असे ते श्रीरामांना मानणारे कल्याणसिंग होते, अशी आठवणही फडणवीस यांनी सांगितली.
राज यांच्या घोषणेनंतर शिवसेना पक्षप्रमुक उद्धव ठाकरे यांनीही लवकरच जाहीर सभा घेणार असल्याचे सांगितले. त्यानंतर, महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत मोठ्या कार्यक्रमात फडणवीसांचीही जाहीर सभा होत आहे. एक रंगारंग उच्च प्रतिचा सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्र दिनाचा आनंद घेण्यासाठी भाजपकडून होत आहे. या सोहळ्यास मुंबईतील शक्तीकेंद्र प्रमुख, बुधप्रमुख आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित राहिले आहेत. आगामी, मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला लक्ष्य करण्यासाठी ही सभा घेण्यात येत असल्याचं दिसून येत आहे.