Devendra Fadanvis: 'महाराष्ट्रात सत्तांतर अटळ, 2024 साली भाजपचं बहुमताचं सरकार येणार'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 06:15 PM2022-03-11T18:15:07+5:302022-03-11T18:16:02+5:30
गोवा विधानसभा निवडणुकीचे प्रभारी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नियुक्ती केल्याने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आलेख कैकपटीने उंचावला आहे.
मुंबई - देशातील ५ राज्यांच्या निवडणूक निकालात भाजपचे बाजी मारली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांतील सत्ता राखण्यात यशस्वी ठरलेल्या भाजपची नजर आता महाराष्ट्र या महत्त्वाच्या राज्यावर वळली आहे. २०२२ अखेर होणाऱ्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीआधीच महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याचा भाजपच्या आक्रमक श्रेष्ठींचा इरादा आहे. तर, महाराष्ट्रात सत्तांतर अटळ असल्याचं भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
गोवा विधानसभा निवडणुकीचे प्रभारी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नियुक्ती केल्याने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आलेख कैकपटीने उंचावला आहे. गोव्यात कोणत्याही अडचणीशिवाय सरकार स्थापन करण्याची जबाबदारी भाजप श्रेष्ठींनी राज्यसभा सदस्य सी. एम. रमेश यांच्यावर सोपविली. गोव्यात भाजपला मिळालेल्या यशानंतर फडणवीस यांचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला आहे. त्यामुळे, महाराष्ट्रात सत्तांतर अटळ असून 2024 मध्ये भाजपचे बहुमताचे सरकार येईल, असे भाकितच त्यांनी केले आहे.
महाराष्ट्रात २८८ सदस्य असलेल्या विधानसभेत भाजपचे १०५ सदस्य असून, अन्य १७ आमदारांचा पाठिंबा मिळविण्यास भाजप सक्षम आहे. भाजपला २८ आमदरांच्या पाठिंब्याची गरज आहे. मात्र, महाविकास आघाडी राज्यात मजबूत असल्याचं महाविकास आघाडीचे नेते सांगत आहेत. त्यामुळेच, फडणवीस यांनी मिशन २०२४ असल्याचं बोलून दाखवलं. फडणवीस यांनी 4 राज्यातील निकालांनंतर भाजप कार्यकर्त्यांचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं. कार्यकर्ता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच हा विजय झाल्याचेही ते म्हणाले. यावेळी, फडणवीसांनी शिवसेनेवर टीकाही केली.
शिवसेना नोटापेक्षाही कमी मत
प्रमोद सावंत यांच्याविरोधात उभा राहिलेल्या शिवसेना उमेदवाराल केवळ 97 मतं मिळाली आहेत. गोव्यात महाराष्ट्रातील भाजपच्या सेनेनं मोठं काम केलं. या विजयात सेनेचं मोठं योगदान आहे. दुसऱ्या सेनेचं गोव्यात काय झालं हे आपण पाहिलं. विशेष म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेनेची मतं एकत्र केली, तरी नोटापेक्षा ही मतं कमी आहेत, असे सांगत दोन्ही पक्षाला फडणवीसांनी टोला लगावला.
गोव्यात शिवसेनेला अपयश
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी वारंवार गोव्याला भेटी दिल्या. त्यांनी उत्पल पर्रीकर विरुद्ध भाजप मुद्दा बनविण्याचाही प्रयत्न केला. शेवटच्या टप्प्यात शिवसेनेचे स्टार प्रचारक म्हणून महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या म्हापसा, डिचोली, वास्को, साखळी येथे सभाही झाल्या. या चारही ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले. शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिटही ते वाचवू शकले नाहीत. तर, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याविरोधात उभारलेल्या शिवसेना उमेदवाराला केवळ 97 मतं मिळाली आहेत.