मुंबई - क्रूझ ड्रग्स प्रकरणानंतर आक्रमक झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. त्यानंतर फडणवीस यांनी मलिक यांचे आरोप फेटाळून लावले. तसेच मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा दावा करत दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार, आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन बॉम्ब फोडला. नवाब मलिक यांचे मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपींशी आर्थिक संबंध आहेत, असे फडणवीस यांनी कागदपत्रांचा दाखला देत सांगितले. त्यानंतर, भाजपा नेत्यांनीही ट्विटरवरुन महाविकास आघाडीला लक्ष्य केलं आहे.
फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपा नेते सोशल मीडियावर आक्रमक झाले आहेत. भाजप नेत्यांकडून राष्ट्रवादी आणि शिवसेनेला लक्ष्य करण्यात येत आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तर, दुसरीकडे भाजपच्या महिला आघाडीच्या प्रमुख चित्रा वाघ यांनीही शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
बॅाम्ब ब्लास्टमध्ये ज्या निष्पाप जीवांचे बळी गेले त्यांच्या कुटुंबीयांशी, महाराष्ट्राच्या जनतेशी, मराठी माणसाशी या सरकारं केलेला हा विश्वासघात आहे. देशवासियांच्या पाठीत महाविकास आघाडीकडून खंजीर खुपसला गेलाय, अशी बोचरी टीका भाजपा महिला आघाडीच्या प्रमुख चित्रा वाघ यांनी केली आहे. तसेच, महाविकास आघाडी का हाथ, अंडरवर्ल्ड के साथ!, असेही त्यांनी ट्विट करुन म्हटलंय. चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केलीय. १९९३ बॅाम्ब ब्लास्टमधील आरोपींच्या मित्रांशी मुख्यमंत्री मांडीला मांडी लावून बसले आहेत. सत्तेसाठी अंडरवर्ल्डची मदत घेणारे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल, असा खोचक टोलाही वाघ यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
काय म्हणाले अतुल भातखळकर
'शिवसेनेला आता बॉम्बस्फोट आरोपींशी झालेल्या व्यवहाराचेही समर्थन करावे लागणार... काय करणार, सत्ता टिकवायची आहे ना!', असे ट्विट भातखळकर यांनी केले आहे. तसेच, 1993 बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींचे नवाब मलिक यांच्याशी साटेलोटे आहे, असेही त्यांनी म्हटलंय.
फडणवीसांचे गंभीर आरोप
सरदार शहावली खान हे 1993 च्या बॉम्बस्फोटात गुन्हेगार म्हणून शिक्षा भोगत असलेले गुन्हेगार आहेत. टायगर मेमनच्या नेतृत्वात ते या बॉम्बस्फोटोत सहभागी होते. टायगर मेमनच्या ज्या इमारतीमध्ये हे कारस्थान शिजलं, त्या मिटींगला ते स्वत: उपस्थित होते. या बॉम्बस्फोटाची संपूर्ण माहितीही त्यांच्याकडे होती. ज्याठिकाणी आरडीएक्स भरलं त्याठिकाणीही ते होते. तर, महमद सलीम इशाक पटेल उर्फ सलीम पटेल यांच्याशीही नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांचे संबंध आहेत.
सलीम पटेल हे तेच आहेत, ज्यावेळी एका इफ्तार पार्टीत त्याचा फोटो चर्चेचा विषय ठरला होता. ला गेले होते, त्या पार्टीत असलेला दाऊदचा हस्तक म्हणजे सलीम पटेल. हसीन पारकरचा हा बॉडीगार्ड आणि ड्रायव्हर आहे. हसीन आपा म्हणजे दाऊदची बहिण. हसीन आपाचा फ्रंटमॅन म्हणजे, ज्याच्यानावाने पॉवर ऑफ अॅटर्नी तयार व्हायची तोच हा सलीम पठाण, असे म्हणत या दोन्ही गुन्हेगारांचे संबंध नवाब मलिक यांच्याशी असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. तसेच, कुर्ल्यातील एलबीएस रोडवर अतिशय महागडी जागा होती. सलीम पटेल आणि सरदार शहावली खान यांच्याकडे या जागेची मालकी होती. सॉलिडस कंपनीला ही जागा विकण्यात आली, त्यामध्ये फराज मलिक यांनी सही केली आहे. मलिक कुटुंबीयांनी ही जमीन विकत घेतल्याचे फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे, हे सर्व कागदपत्रे आणि पुरावे मी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे देणार आहे. शरद पवारांनाही कळायला हवं, त्यांच्या मंत्र्यांनी काय दिवे लावलेत, असे म्हणत फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला.