मुंबई - राज्यात MIM चे खासदार इम्तियाज जलील (MIM Imtiaz Jaleel) यांनी केलेल्या विधानावरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपच्या पराभवासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असं इम्तियाज जलील यांनी म्हटले. तसेच, MIM महाविकास आघाडीत यायला तयार आहे, हा निरोप शरद पवारांपर्यंत पोहोचवा अशी विनंतीही जलील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपेंना केल्याने आता चांगलेच राजकारण रंगले आहे. भाजपने यावरुन शिवसेनेला लक्ष्य केले असून भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे.
MIM सोबतच्या आघाडीबाबत शिवसेना काय करते याकडे आमचं लक्ष असेल. निवडणुकीत पराभव झाल्यावर विरोधकांना ईव्हीएममध्ये गोंधळ दिसतो. बी टीम दिसते, सी टीम दिसते. त्यामुळे हरल्यावर अनेक गोष्टी बोलत असतात त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. आता सत्तेसाठी शिवसेना (Shivsena) काय करते हे दिसून येते. शिवसेनेने हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलेलं आहे. अजानची स्पर्धा भरवली जाते. त्याचा परिणाम आहे का हे दिसेल, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला टोला लगावला.
फडणवीसांच्या या विधानानंतर शिवसेननंही त्यांना आरसा दाखविण्याचं काम केलंय. शिवसेनेच्या आमदार डॉ.मनिषा कायंदे यांनी देवेंद्र फडणवीसांचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच, जबान देवेंद्र फडणवीस असं लिहिलेली एक पत्रिकाही ट्विटरवर शेअर केली आहे. त्यासोबतच, तेव्हा तुमचा स्वाभिमान वाकला/झुकला नाही का? असा प्रश्नही महिला आमदारांनी विचारला आहे.
महाराष्ट्रातील जनता मोदींसोबत - फडणवीस
भाजपाने आता जलील यांच्या ऑफरवरून शिवसेनेला कोडींत पकडलं आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadnavis) म्हणाले की, MIM ने महाविकास आघाडीसोबत जरूर जावं. ते सगळे एकच आहेत. भाजपाला हरवण्यासाठी सर्व एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु कुणीही सोबत आलं तरीही महाराष्ट्रातील जनता, देशातील जनता मोदींच्या मागे आहे. ती भाजपालाच निवडून देईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.