मुंबई - राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळास लवकरच अडीच वर्षे पूर्ण होत आहेत. भाजप आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रीपदाचे सम-समान वाटप म्हणजे अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यास नकार दिल्याने युती तुटली. त्यानंतर, राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. मात्र, नितीन गडकरींनी मनात आणलं तर शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येऊ शकते, असे शिवसेना नेते आणि मंत्री अब्दुल्ल सत्तार यांनी म्हटलं होतं. सत्तार यांच्या या विधानावर आता भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं अन् मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. त्यामुळे, भाजप शिवसेना पुन्हा एकत्र येणार का? असा प्रश्न सातत्याने चर्चिला जात आहे. त्यातच, अब्दुल सत्तार यांच्या विधानामुळे ही चर्चा जोर धरत आहे. आता, फडणवीस यांनी सत्तारांच्या विधानाल गंभीरतेनं घेण्याची गरज नसल्याचेच सूचवले आहे.
''मला आनंद आहे की अब्दुल सत्तारांना वाटतं, नितीन गडकरी हे भाजप-शिवसेनेला एकत्र आणू शकतात. नितीन गडकरी हे आमचे मोठे नेते आहेत. मात्र, अब्दुल सत्तार हे, नया है वह... असे आहेत. त्यांना शिवसेनेचं काय माहिती आहे. मला तर असं वाटतं गेल्या 5 ते 6 महिन्यांत ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना तरी भेटले आहेत की नाही. हे बोलायला कोणीतरी महत्त्वाचं माणूस लागतं ना?'', असे म्हणत फडणवीस यांनी अब्दुल सत्तार यांचं विधान गंभीरतेनं घेण्याची गरज नसल्याचंच सूचवलं आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेनेनं बाहेर पडून भाजपसोबत यावं, असं रामदास आठवले यांनी यापूर्वी म्हटलं होतं. त्यामुळे, महाराष्ट्राच्या राजकारणात भविष्यात काय होईल, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. काय म्हणाले अब्दुल सत्तार
अब्दुल सत्तार हे दिल्ली गेले होते, तेथे त्यांनी महत्त्वाच्या मंत्र्यांच्या भेटीही घेतल्या. शिवसेनेचे वरिष्ठ नेते ज्यादिवशी निर्णय घेतील आणि नितीन गडकरी व अमित शहा यांनी पुढाकार घेतल्यास काहीही होऊ शकते. मी शिवसेनेचा साधा कार्यकर्ता आहे, पण भविष्यात युतीचा प्रस्ताव गेला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आणखी पुढील अडीच वर्षे देण्याचा प्रस्ताव ठेवल्यास निश्चितच विचार विनिमय होऊ शकतो, असेही अब्दुल सत्तार यांनी म्हटलं. तसेच, महाराष्ट्रात भविष्यात कुठलंही परिवर्तन करायची असल्याच, त्याची चावी म्हणजे नितीन गडकरी, असंही त्यांनी सांगितलं.