Join us  

Devendra Fadanvis: 'बाबा ताजुद्दीनचरणी नतमस्तक'; फडणवीसांचा व्हिडिओ शेअर करत शिवसेनेनं साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 7:50 PM

Devendra Fadanvis: शिवसेनेच्या महिला नेत्या मनिषा कायंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

मुंबई - महाविकास आघाडी सरकारला हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन कायम कोंडीत पडकत भाजपने अखेर राज्यात सत्तांतर घडवलं. शिवसेनेत बंडखोरी केलेल्या आमदारांनी हिंदुत्त्वाच्या मुद्यावरुन आम्ही शिवेसनेसोबत फारकत घेत असून भाजपसोबत सरकार स्थापन करत असल्याचं म्हटलं. त्यानंतर, राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री बनले. राज्यात युतीचं सरकार स्थापन झालं. मात्र, ज्या हिंदुत्त्वाच्या मुद्दयावरुन भाजपने शिवसेनेवर सातत्याने टिका केली. त्याच मुद्द्यावरुन आता शिवसेनेनं देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे.

शिवसेनेच्या महिला नेत्या मनिषा कायंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यावरुन, हिंदुत्वाचा सवालही केला. त्या व्हिडिओत देवेंद्र फडणवीस हे बाबा ताजुद्दीन यांच्या चरणी आपण नतमस्तक होत असल्याचं सांगत भाविकांना शुभेच्छा देत असताना दिसून येत आहेत. 'सय्यद हजरत मोहम्मद बाबा ताजुद्दीन यांचा उरुस दरवर्षी साजरा केला जातो. यंदा उरूसची शतकपूर्ती होत आहे. त्यामुळे, मी बाबा ताजुद्दीन यांच्या सर्व भाविकांना शुभेच्छा देतो आणि बाबा ताजुद्दीनच्या चरणी नतमस्तक होतो, असे फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

ताजुद्दीन बाबा नागपूर आणि अनेक ठिकाणाहून आलेल्या भाविकांसाठी प्रेरणास्थान राहिले आहेत. कुठल्याही धर्माचा व्यक्ती असो, तो ताजुद्दीन बाबांच्या दर्गावर दर्शन करण्यासाठी जात असतो. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो, तेव्हा ताजबाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला होता, त्यामुळे, अनेक विकासकामे येथे पूर्ण झाली. येथे येणाऱ्या भाविकांची मोठी सोय झाली. यापुढेही राज्य सरकार मदत देण्यासाठी सदैव तत्पर आणि तय्यार राहिल, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. 

शिवसेनेच्या नेत्या आमदार मनिषा कायंदे यांनी उपमुख्यमंत्र्यांचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच, यासोबत उद्धव ठाकरेंची तुलना करणारे कॅप्शन देत भाजपवर निशाणा साधला. हेच जर उद्धव ठाकरेंनी केलं असतं, तर त्यांनी हिंदुत्त्व सोडलं असा अपप्रचार केला असता.... असे कॅप्शन आमदार कायंदे यांनी दिलं आहे. त्यामुळे, भाजपाकडून सातत्याने हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर होत असलेल्या टिकेला प्रत्युत्तर देत, भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनाच शिवसेनेनं सवाल केला आहे. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसशिवसेनानागपूर