मुंबई - शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने पत्राचाळ घोटाळाप्रकरणी अटकेची कारवाई केली आहे. ईडीने संजय राऊत यांच्याविरोधात केलेल्या कारवाईबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. आजचं देशातील राजकारण हे निर्घृण आणि घृणास्पद बनलेलं आहे. संजय राऊत यांचा मला अभिमान आहे. ते माझे मित्र आहेत. त्यांचा काय गुन्हा आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. तर, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पत्राचाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊत यांना अटक करुन आज विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. रविवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास ईडीचे अधिकारी राऊत यांच्या मुंबईतील भांडुप येथील मैत्री बंगल्यावर झाडाझडतीसाठी पोहोचले होते. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊतांवर बोचरी टीका केली आहे. सकाळचा 8 वाजताचा भोंगा बंद झालाय, तो आत गेलाय, असे शिंदे यांनी म्हटले. ते औरंगाबाद जिल्हा दौऱ्यादरम्यान एका सभेला संबोधित करत होते. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी सावधपणे प्रतिक्रिया देत अधिक बोलणे टाळले.
''मला असं वाटतं की, कुठलीही एजन्सी कारवाई करताना त्यांच्याकडील पुराव्याच्या आधारे कारवाई करत असते. एजन्सीने आता कारवाई केली असून विषय न्यायालयात पोहोचला आहे. त्यामुळे, आता याप्रकरणी मी अधिक बोलू इच्छित नाही,'' अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दरम्यान, राऊत यांच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. महाविकास आघाडीचे नेते या कारवाईचा विरोध करत असून भाजप नेते समर्थन करताना दिसून येत आहे.
शिवसेना फोडण्याचं पाप राऊतांनी केलं - शिरसाट
संजय राऊतांच्या अटकेसंदर्भात बोलताना शिंदे गटाती आमदार संजय शिरसाट म्हणाले, "काल ईडीच्या कारवाईवेळी संजय राऊत जे हातवारे करत होते ते अतिशय चुकीचे होते. ईडीची कारवाई सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यावरही झाली. परंतु, अशा अविर्भावात ते वागले नाहीत. संजय राऊतांना त्यांची लायकी आज कळेल. ज्यांच्या नादी लागून संजय राऊतांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली. त्या कर्माची ही फळे आहेत. संजय राऊत हा त्यांचा प्यादा होता, या प्यादाचे काम आता संपले आहे. शिवसेना फोडण्याचे काम राऊतांनी केले. संजय राऊत शिवसेनेसोबत होते की राष्ट्रवादीसोबत होते, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती होते, असेही शिरसाट यांनी म्हटले आहे.