मुंबई - देशातील पाच राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या शेजारील गोवा राज्यातही विधानसभा निवडणूक (Goa Election 2022) होत आहे. महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही महाविकास आघाडीसाठी प्रयत्न सुरू आहेत. भाजपने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना निवडणूक प्रभारी म्हणून गोव्यात पाठवले आहे. यातच देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ओपन चॅलेंज दिले आहे. त्यावरुन, राऊत आणि फडणवीस यांच्यात जुगलबंदी रंगली आहे.
महाराष्ट्रात ज्याप्रकारे तीन पक्षांनी जनमताची चोरी केली, ती आम्ही गोव्यात होऊ देणार नाही. शिवसेनेने आपले डिपॉझिट जप्त होऊ नये याकडे लक्ष द्यावे, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात बोलताना लगावला होता. गोव्यात शिवसेना भाजपाच्या नोटांना पुरून उरेल, असा पलटवार राऊत यांनी केला. राऊतांच्या या टिकेला प्रत्युत्तर देताना फडणवीस यांनी हो शिवसेनेला NOTA ला जेवढी मतं पडतात, तेवढीच मतं मिळणार असल्याचं म्हटलं आहे.
शरद पवार यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्यांनी आपली उंची तपासावी, त्यांच्याएवढं कर्तृत्व करावे, तेवढी उंची गाठावी, असा टोला राऊत यांनी भाजपला लगावला होता. त्यास, प्रत्युत्तर देताना फडणवीस यांनी राऊत हे कोणाचे प्रवक्ते आहेत हे आम्हाला माहिती आहे, असे म्हटलं. तसेच, राऊत यांनीही पंतप्रधानांबद्दल बोलताना आपली उंची पाहावी, आपण बोलतो किती याचा विचार करावा, असा प्रतिटोलाही फडणवीस यांनी लगावला.
देवेंद्र फडणवीसांना हा माझा शब्द - राऊत
गोव्यात आमची खरी लढाई नोटांशीच आहे. भाजपचे लोक गोव्यात नोटांचा पाऊस पाडत आहेत. विशेषत: महाराष्ट्रातून बॅगा जात आहेत. त्यामुळे शिवसेनेसारखा पक्ष गोव्यात त्या नोटांशी नक्की लढेल आणि जनतेला दबावाखाली येऊ नका, असे सांगण्याचा प्रयत्न करेल. शिवसेना हा सर्वसामान्यांचा, बहुजनांना, हिंदुत्ववादी पक्ष आहे. शिवसेना भाजपच्या नोटांना पुरून उरेल हे नक्की आहे. फडणवीसांना माझा शब्द आहे तुम्ही कितीही नोटा टाका आम्ही नोटांशी लढू, असे पलटवार संजय राऊत यांनी केला आहे.