मुंबई - मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीकेसीतील सभेत भाजपवर शरसंधान साधले. हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडक शब्दात टिका केली. तसेच, केंद्रातील भाजप सरकारवर महागाईच्या मुद्द्यावरुन जबरी टिका केली. त्यामुळे, देवेंद्र फडणवीस यांच्या गोरेगावच्या नेस्को येथील सेंटरमध्ये होत असेल्या सभेकडे राज्याचे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणे या सभेत फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. मुख्यमंत्र्यांची सभा ही लाफ्टर सभा, लाफ्टर सभा, लाफ्टर सभा होती, असे म्हणत उद्धव ठाकरेंच्या सभेची खिल्ली उडवली. त्यानंतर, समोर उपस्थित हिंदी भाषिकांना उद्देशून ''हमार भाई और बहिण, का हालचाल बा? सब ठीक हौ ना?'', असे म्हणत हिंदी भाषेत भाषणाला सुरुवात केली.
उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या ट्वीटमध्ये उद्धव ठाकरेंचं नाव न घेता ‘टोमणे बॉम्ब’ म्हणत टोला लगावला होता. तसेच, “सर्वत्र पळापळ अन् गदारोळ, नागरिक भयभीत अन् विरोधक दहशतीत. सर्वत्र सन्नाटा अन् लोक घामाघूम… अरे छट. हा तर निघाला आणखी एक टोमणे बॉम्ब. जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या टीकेला देवेंद्र फडणवीस नेमकं काय उत्तर देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
सभेसाठी जमलेल्या लोकांना उद्देशून का हालचाल बा... सब ठिक बा.. असे म्हणत फडणवीसांनी हिंदी भाषेत भाषणाची सुरुवात केली. त्यानंतर, भ्रष्टाचार, गुन्हेगारी, दाऊदशी संबंध, कोविडमधील भ्रष्टाचार, मनसुख हिरेनप्रकरणावरु राज्य सरकारवर टिका केली. गेल्या 2.5 वर्षात या महाशयांनी राज्याच्या विकासासंदर्भात एकही भाषण दिलं नाही. हनुमान चालिसेतील दोनच ओळी या सरकारला माहिती आहेत. त्यातूनच, यशवंत जाधवांनी 5 पट संपत्ती जमा केली अन् मातोश्रींना 50 लाखांचं घड्याळ भेट दिलं, असे म्हणत शिवसेनेवर टिका केली.
मी जेव्हा म्हटलं राम मंदिर आंदोलनात तुमचा एकही नेता नव्हता, तेव्हा किती मिर्ची लागली. अरे, ''मै तो अयोध्या जा रहा था, बाबरी गिरा रहा था, मै तो मंदिर बना रहा था, तुझको मिर्ची लगी तो मै क्या करू. तुझ को मिर्ची लगी तो मै क्या करू, असे म्हणत फडणवीसांनी बाबरी मशिद पाडायला गेलेल्या टिकेवरुन उद्धव ठाकरेंवर प्रतिहल्ला केला. फेब्रुवारी महिन्यात परीक्षा झाल्या, जून महिन्यात मी वकील झालो, जुलै महिन्यात निवडणुका झाल्या आणि नगरसेवक देवेंद्र फडणवीस बाबरी पाडायला गेला होता. लाठी गोली खाएंगे, मंदिर वही बनाएंगे, असे म्हणत आम्ही अयोध्येला गेलो होतो. मी तुरुंगातही गेलो होतो, कारसेवेला गेलो तेव्हा हा फडणवीस तुरुंगात होता. आम्ही फाईव्ह स्टार राजकारण केलं नाही, आम्ही मंदिरात झोपलो, प्लॅटफॉर्मवर झोपलो, फुटपाथवर झोपलो, तिकीट काढायलाही पैसे नव्हते, असे म्हणत फडणवीसांनी बाबरीचा त्यांचा प्रवास सांगितला.
बाबरी पाडायला गेलो तेव्हा माझं वजन 128 किलो होतो, आता माझं वजन 102 किलो आहे. देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली आणल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना चॅलेंज दिलं.