Devendra Fadanvis: पवारांनी काँग्रेस सोडली तेव्हा कायदे नव्हते, धनुष्यबाण चिन्हाबाबत स्पष्टच बोलले फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 01:33 PM2022-08-10T13:33:03+5:302022-08-10T13:35:11+5:30
Devendra Fadanvis: शिवसेनेचं चिन्हं असलेल्या धनुष्यबाणावरून होणाऱ्या वादाकडे शरद पवारांनी लक्ष वेधलं
मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा अखेर 39 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला. यात भाजपच्या 9 आणि शिंदे गटातील 9 आमदारांनी शपथ घेतली. एकीकडे शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर शिंदे गटाने भाजपसोबत सत्ता स्थापन केल्याचा वाद सध्या न्यायप्रविष्ट आहे. मात्र, तरीही मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आल्यावरुन शिवसेनेनं ही लोकशाहीची हत्या असल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे शरद पवार यांनीही या वादावर भाष्य केलं आहे.
शिवसेनेचं चिन्हं असलेल्या धनुष्यबाणावरून होणाऱ्या वादाकडे शरद पवारांनी लक्ष वेधलं. हे शिवसेनेचं चिन्ह (Shivsena) असून; यावरून वाद करणे योग्य नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. 'धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. एखाद्या पक्षाच चिन्ह काढून घेणं योग्य नाही', असं म्हणत शरद पवार यांनी जर एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांना वेगळी भूमिका घ्यायची असेल तर वेगळा पक्ष काढू शकतात असंही सुनावलं. त्यावर, आता देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली आहे. तसेच, शंभूराजे देसाई यांनीह शरद पवारांच्या सल्ल्याबद्दल शिंदेगटाची भूमिका स्पष्ट केली आहे.
शरद पवारांनी पक्ष बदलला तेव्हा कायदेच नव्हते. डिफेक्शनचे कायदे कुठे होते तेव्हा, कोणालाही कसेही बदलता येतात. आज कायदे तयार झालेले आहेत. त्यामुळे कायदेशीर लढाई लढावी लागणार आहे, ती एकनाथ शिंदे आणि शिवसेना करत आहे, असे म्हणत शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेल्या पक्षातील चिन्हाच्या वादावर देवेंद्र फडणवीसांनी आपली भूमिका मांडली आहे. ठाणे येथे लोकमतच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाले. त्यावेळी, माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी पवारांच्या प्रतिक्रियेबद्दल विधान केले.
शरद पवारांचं दु:ख जरा वेगळं
भाजपाकडून प्रादेशिक पक्षांना आणि सहकारी पक्षांना संपविण्यात येत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केल्यासंदर्भात देवेंद्र फडणीसांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी, उत्तर देताना पवारसाहेबांचं दु:ख जरा वेगळंच आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. ''आमच्याकडे 115 आमदार आहेत, आमच्या मित्र पक्षाकडे 50 आमदार आहेत. तरीही आमच्यासोबतच्या पक्षाला मुख्यमंत्री केलं. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या 9 आणि शिवसेनेच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. पवारसाहेबांचं दु:ख जरा वेगळंय, ते आपल्या सर्वांनाच माहितीय,'' असे म्हणत फडणवीस यांनी शरद पवारांच्या आरोपाला प्रत्यु्त्तर दिलंय.
शंभूराजे देसाईंचं पवारांना प्रत्युत्तर
मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, शरद पवारांबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला आदर आहे. पवारांनी काँग्रेसमधून फुटून राष्ट्रवादी पक्ष काढला. परंतु आम्ही शिवसेनेतून फुटलो नाही तर आम्हीच मूळ शिवसेना आहोत. बहुमतात आहोत. आमदार, खासदार, नगरसेवक, सरपंच यांच्यातही बहुमत आहे. आम्ही मूळ शिवसेना असल्याने जी चिन्हाबाबत निर्णय घेणारी संस्था निवडणूक आयोग आहे त्यांच्याकडे आम्ही आमचं म्हणणं मांडले आहे. केंद्रीय निवडणूक आयोग पडताळणी करून निर्णय घेतील. आम्ही मूळ शिवसेना आहोत हे आमचं म्हणणं कालही, आजही तेच आहे असं त्यांनी सांगितले.
भाजप मित्रपक्षांना संपवतोय - शरद पवार
निवडणुकीत एकत्र यायचे, मित्र पक्षातील लोकांच्या जागा कशा कमी येतील याची काळजी घ्यायची घ्यायची आणि हळूहळू मित्रपक्षांना संपवायचे, ही भाजपची रणनिती आहे. महाराष्ट्रात शिवसेनेत फूट कशी पडेल, अशी परिस्थिती निर्माण केली. अशीच खेळी बिहारमध्ये सुरू होण्याआधीच नितीश कुमार वेळीच सावध झाले. त्यांनी तातडीने राजीनामा दिला. आता भाजपचे नेते त्यांच्यावर टीका करत आहेत. परंतु नितीश कुमारांनी टाकलेले पाऊल शहाणपणाचे आहे, असे सांगत शरद पवार यांनी महागठबंधन करण्याच्या निर्णयाला समर्थन दिले आहे.