Devendra Fadanvis: लिलावतीमधील फोटोवरुन कारवाई करणारे औरंगजेबच्या कबरीवर गप्प का?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 09:14 PM2022-05-13T21:14:33+5:302022-05-13T21:23:26+5:30
अकबरुद्दीन ओवेसींनी आपल्या जाहीर सभेत बोलताना आपण तिरस्काराचं उत्तर प्रेमानं देणार असल्याचं म्हणत राज ठाकरेंवर जबरी टीका केली
मुंबई - एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी गुरुवारी खुलताबाद येथील विविध दर्ग्याला भेट देवून दर्शन घेतले. मात्र, त्यांनी यावेळी औरंगजेब याच्या कबरीचे दर्शन घेतल्याने वादाला तोंड फुटले आहे. राज्यातील विविध नेते यावरुन टीका करत आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनीही या भेटीवरुन अकबरुद्दीन ओवेसींनी थेट इशारा देत राज्य सरकारवर जहरी टीका केली आहे. त्यानंतर, आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही औरंगजेबाचं महिमा मंडन आम्ही चालू देणार नाही, असे म्हणत कारवाईची मागणी केली आहे.
अकबरुद्दीन ओवेसींनी आपल्या जाहीर सभेत बोलताना आपण तिरस्काराचं उत्तर प्रेमानं देणार असल्याचं म्हणत राज ठाकरेंवर जबरी टीका केली. माझा एक खासदार आहे, तू तर बेघर आहे. मी तुला काय उत्तर देऊ, अशा शब्दात राज ठाकरेंचं नाव न घेता त्यांच्यावर टिका केली. तत्पूर्वी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुले वाहिल्यामुळे ओवेसींवर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात टिका होत आहे. राष्ट्रवादी, मनसे, भाजप, शिवसेनेच्या नेत्यांनी या कबरीवरील फुलं वाहण्याचा संताप व्यक्त केला आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही हे मान्य करणार नाही, त्याची जागा त्याला दाखवून देऊ, अशा शब्दात ओवसींवर प्रहार केला.
''ठाकरे सरकारमध्ये हनुमान चालिसा म्हटली की कारवाई होते, पण काश्मिर तोडणाऱ्यांचा नारा देणाऱ्यांवर कारवाई होत नाही, शर्जिलवर कारवाई होत नाही,'' अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. औरंगजेबाच्या कबरीचं महिमा मंडन करुन तुम्ही महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या देशभक्त मुसलमानांचा अपमान केला आहे. या देशात औरंगजेब हिंदुंचा तर नाहीच पण मुसलमानांचाही नेता होऊ शकत नाही. कारण या देशावर त्याने आक्रमण केलं आहे, असे म्हणत फडणवीसांनी अकबरुद्दीन औवेसींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
औरंगजेब हा या देशातील मुस्लिमांचा सुद्धा आदर्श होऊ शकत नाही. त्यामुळे असे महिमामंडन आम्ही कधीही सहन करू शकत नाही!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 13, 2022
मुंबई येथे माध्यमांशी संवाद...https://t.co/eGlhJ41x4V#Maharashtra#Mumbaipic.twitter.com/2mQT3TFPmH
ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी राजांना तडफडवून त्यांची निर्घृण हत्या केली. अशा औरंगजेबाचं महिमा मंडन आम्ही मान्य करणार नाही. त्यामुळे अशा प्रकारचं महिमा मंडन कोणी करत असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. छोट्या-छोट्या गोष्टींवर कारवाई करणारे, लीलावतीत एखादा फोटो ट्विट झाला तर कारवाई करणारे आता गप्प का आहेत, असा सवालही फडणवीसांनी उपस्थित केला. सरकारने कारवाई केली नाही तरी आम्ही हे सहन करणार नाही. याची जागा त्याला दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे.
काय म्हणाले नितेश राणे
या कारट्या ओवेसी ला माहीत आहे की, मी औरंगजेबाच्या थडग्यासमोर नागडा नाचलो तरी मला दोन पायावर महाराष्ट्रात फिरता येईल. कारण, राज्यामध्ये "नामर्दांचे सरकार आहे'', याला म्हणतात यांचे खरे हिंदुत्व !, अशा प्रखर शब्दात नितेश राणेंनी राज्य सरकारवर जहरी टिका केली आहे. तसेच, मी आव्हान करतो, पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा. याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर...आम्ही शिवरायांचे मावळे नाही !, असा इशाराही राणेंनी ट्विटरवरुन दिला आहे.
शिवसेनेचाही संताप
औरंगजेब हा स्वराज्याचा शत्रू होता, त्याने हिंदूंच्या देवस्थानाची, मंदिरांची नासधूस केली. खरं म्हणजे ज्याने स्वराज्याचा द्रोह केला अशा देशद्रोही औरंगजेबाच्या कबरीवर ओवेसीने जे काही केलं त्याचा मी निषेध करतो, अशी संतापजनक प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. मंत्री शिंदे आज प्रगती कॉलेजच्या रौप्य महोत्सव निमित्त आयोजित वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांचा सन्मान सोहळ्याला डोंबिवलीत आले होते. त्यावेळी, त्यांनी औरंगजेब वादावर स्पष्ट मत व्यक्त केलं.