मुंबई - मनसेप्रमुखराज ठाकरे यांच्या १ मे रोजी होणाऱ्या औरंगाबादमधील सभेला अखेर परवानगी मिळाली आहे. पोलिसांनी एकूण १६ अटी घालत राज ठाकरेंच्या परवानगी दिल्याने आता मनसैनिक औरंगाबादेतील जंगी सभेच्या तयारीत गुंगतले आहे. राज यांनी अचानक हिंदुत्त्वादी भूमिका घेत राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला. त्यामुळे, भाजप आणि मनसे युती होईल, अशा चर्चा रंगल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं.
मनसेनं घेतलेल्या भूमिकेवरुन सध्या भाजप आणि मनसेची युती होणार का, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी विचारला होता. त्यावर, मनसेसोबत युतीच्या बातम्या, चर्चा ह्या कलोकल्पित आहेत. सध्यातरी तसा कुठलाही प्रस्ताव नाही. तसेच, औपचारीक चर्चाही या युतीसंदर्भात आमची झालेली नाही. मात्र, राज ठाकरेंनी सध्या जे मुद्दे घेतले आहेत. मग तो हिंदुत्त्वाचा मुद्दा असो, किंवा आता त्यांनी उचलून धरलेला भोंग्यांचा मुद्दा असो. आम्हीही हे मुद्दे यापूर्वी घेतलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन झाले पाहिजे, असे म्हणत फडणवीस यांनी मनसेसोबतच्या युतीच्या चर्चा स्पष्ट शब्दात खोट्या असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनाही मनसेसोबतच्या युतीचा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, याबाबत जनमताचा कौल घेऊन निर्णय घ्यावा लागेल, असे सूचक विधान दानवेंनी केलं आहे.
पोलिसांनी सभेला काय अटी घातल्या
मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर मनसेनं सभेची जय्यत तयारी केली असून पोलिसांनीही बंदोबस्ताचा प्लॅन तयार केला आहे. पोलिसांनी घातलेल्या अटीमध्ये सदर सभा ०१/०५/२०२२ रोजी १६.३० ते २१.४५ या वेळेतच आयोजीत करावी. तसेच कार्यक्रमाचे ठिकाण आणि वेळेत कोणत्याही प्रकारचा बदल करु नये, असं सांगण्यात आलं आहे. तसेच सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वंयशिस्त पाळावी. सभेला येताना व परत जाताना कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करु नये, असं म्हटलं आहे. कार्यक्रमा दरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटक पदार्थ बाळगु नये, अगर प्रदर्शन करु नये व शस्त्र अधिनियमातील तरतुदीचा भंग करु नये, अशी तंबीही पोलिसांनी दिली आहे.