Join us

"स्मारकाच्या कामात स्थगिती आणणाऱ्या काँग्रेसच्या वकिलांचाही..."; संभाजीराजे छत्रपतींना फडणवीसांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2024 3:10 PM

शिवस्मारकाची पाहणी करण्यासाठी आलेल्या संभाजीराजे छत्रपतींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सल्ला दिला आहे.

Devendra Fadnavis on SambhajiRaje Chhatrapati : अरबी समुद्रामध्ये उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम अद्यापही सुरु न झाल्याने  स्वराज्य पक्षाचे नेते, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत. २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जलपूजन पार पडले होते. मात्र, त्यानंतर अद्यापही स्मारकाचे काम झाले नसल्यामुळे संभाजीराजे छत्रपतींनी सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले आहेत. मुंबईत संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली समुद्रातील शिवस्मारकाचा शोध घेण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांकडून संभाजीराजेंना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सगळ्या प्रकरणावरुन आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची पाहणी करण्यासाठी संभाजीराजे छत्रपती हे त्यांच्या स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांसह गेट वे ऑफ इंडिया येथे पोहोचले होते. यावेळी त्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान धक्काबुक्की देखील झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना संभाजीराजेंनी सरकारवर टीकास्त्र डागलं. केंद्रात तुमचं सरकार, राज्यात देखील तुमचं सरकार, स्मारकाचं जलपूजनही तुम्हीच केलं. मग स्मारक का झालं नाही?, असा सवाल यावेळी संभाजीराजे छत्रपतींनी केला. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीराजेंनी या कामासाठी स्थगिती आणणाऱ्यांचाही निषेध केला पाहिजे असं म्हटलं आहे.

"स्मारक झालं पाहिजे ही तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. केवळ या स्मारकाच्या विरोधात कोर्टामध्ये जाऊन स्थगिती आणणारे कोण आणि ते कुणाचे वकील आहेत हे संभाजीराजेंनी बघितलं पाहिजे. काँग्रेस पक्षाचा अधिकृत प्रचार करणारे वकील हे कोर्टात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होऊ नये म्हणून स्थगिती आणतात. त्यामुळे त्यांचाही योग्य शब्दात संभाजीराजेंनी निषेध केला पाहिजे. आम्ही कोर्टात भांडत आहोत. आम्ही ते स्मारक कोर्टाकडून मंजूर करुन घेऊ," असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठं स्मारक व्हावं ही त्यावेळी सर्व नेत्यांची इच्छा होती.  २०१६ मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीच्या अगदी आधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते जलपूजन करण्यात आलं. पंतप्रधान मोदी ज्यावेळी जलपूजन करण्यासाठी येतात, याचा अर्थ तुमच्याकडे सर्व परवानग्या आहेत. त्याशिवाय देशाचे पंतप्रधान जलपूजनासाठी येणार नाहीत. तेव्हा मी देखील त्या ठिकाणी उपस्थित होतो. मलाही याचं कौतुक वाटलं. मग ज्या प्रकारे सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्मारक उभा राहिलं. मला तुलना करायची नाही. पण, २०१६ मध्ये स्मारकासाठी जलपूजन झालं आणि त्यासाठी एक समितीही स्थापन झाली. मात्र, त्यानंतर पुढे काय झालं?, असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे.

"सर्वांना विचारलं की हे स्मारक का उभा राहीलं नाही? तर सर्वांचं उत्तर पर्यावरणाच्या अडचणी निर्माण झाल्या आणि पुढे हा विषय न्यायालयात गेला असं आलं. त्यामुळे आम्हाला काही करता येत नाही, असं सांगण्यात आलं. मग आता माझा या सरकारला प्रश्न आहे की, तुमचं केंद्रात सरकार, तुमचं राज्यात सरकार, तुम्हीच घोषणा केली, तुम्हीच स्मारकाचं जलपूजन केलं. मग स्मारक का झालं नाही," असेही संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

टॅग्स :देवेंद्र फडणवीससंभाजी राजे छत्रपतीनरेंद्र मोदीमुंबई