राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याच्या आरोपाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्यासह 70 जणांवर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. पवारांवरील केलेली कारवाई राजकीय सुडबुद्धीने केल्याचा आरोप पवार समर्थकांनी केला आहे. शरद पवारांच्या समर्थनार्थ बारामती बंदची हाक कार्यकर्त्यांनी दिली आहे. यावरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. यावेळी बोलता बोलता, पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असं त्या नकळतपणे बोलून गेल्या.
बारामती बंद करणं हास्यास्पद असल्याचं दमानिया यांनी ट्विट करुन म्हटलं आहे. आपल्या ट्विटरवरुन बोलताना त्या म्हणाल्या की, शरद पवारांच्या समर्थकांनी बारामती बंदचं आवाहन केलं आहे. हे हास्यास्पद आहे. चोरी तो चोरी उपरसे सिना जोरी असं सांगत बारामती कायमची बंद ठेवा, कोणाला फरक पडतोय? मात्र त्यामुळे तुम्ही बारामतीपुरते मर्यादित आहेत हे सिद्ध होतं अशा शब्दात दमानिया यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे.
याप्रकरणी एका वृत्तवाहिनीशी बोलताना कुठल्याही बंदला माझा विरोधच राहिल. बंदमुळे इकॉनॉमी लॉस होतो, लोकांचे हाल होतात, रुग्णांचे हाल होतात, असे म्हणत दमानिया यांनी राज ठाकरेंचं उदाहरण दिलं. राज ठाकरेंच्या समर्थकांनी बंदचं आवाहन केलं होतं, त्यावेळी राज यांनी बंद मागे घ्यायला लावला. मात्र, पवारांनी तसं काहीही सांगितलं नाही. त्यामुळे कायदेशीर मार्गाने लढाई लढावी, बंद करू नये अशी माझी भूमिका असल्याचे दमानिया यांनी म्हटले.
त्याचवेळी बोलताना, शरद पवार जरी या पदावर नसले तरी, त्यांचा सहभाग असल्याशिवाय ईडीकडून ही कारवाई होऊच शकत नाही. पण, तसं नसेल तर ईडीवर सर्वात मोठी कारवाई झाली पाहिजे, असेही दमानिया यांनी म्हटले. तसेच, सरळ सरळ हेच होणार आहे की, आत्ताच्या घटकेला याच्या बोंबा देऊन पुढे काहीही होणार नाही. ही केस जसं, ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात मुख्यमंत्रीपदी पुन्हा त्यांचे फडणवीस आल्यावर शरद पवारांवरही कारवाई होणार नाही, अन् अजित पवारांवरही कारवाई होणार नाही, यात काही शंका नाही, असे दमानिया यांनी म्हटले. विशेष म्हणजे असे सांगताना अप्रत्यक्षपणे त्यांनी पुन्हा भाजपप्रणित सरकार येईल अन् मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होतील, असं सूचित केलं.