लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळातील एकही नोकरभरती घोटाळ्यांशिवाय झालेली नाही. या घोटाळ्यांची तार मंत्रालयापर्यंत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत केला.
इतर कामकाज बाजूला ठेवून पेपरफुटीबद्दल चर्चा करावी, अशी मागणी करीत फडणवीस यांनी स्थगन प्रस्ताव दिला होता. उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी तो फेटाळला; मात्र, या विषयावर सभागृहात स्वतंत्रपणे चर्चा करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
फडणवीस म्हणाले, आरोग्य, म्हाडा, टीईटी अशा सगळ्याच परीक्षांमध्ये गडबडी झाल्या. एकेका पदासाठी २० लाखांची बोली लागली होती. एकट्या अमरावतीत २०० जणांनी पैसे दिले. दलाल रेटकार्ड घेऊनच फिरत होते. अनेक पुरावे यासंदर्भात आपल्याकडे असून चर्चेच्या वेळी ते आपण मांडू.
काँग्रेसचे नाना पटोले यांनी, हे घोटाळे कधीपासून सुरू झाले, असा सवाल करीत आधीच्याही सरकारमध्ये या घोटाळ्याची तार असल्याचे सूचित केले. या विषयावर सभागृहात स्वतंत्रपणे चर्चा झालीच पाहिजे, असा आग्रह त्यांनी धरला.