मुंबई - पॉप स्टार गायिका रिहानाच्या ट्विटनंतर देशात ट्विटर वॉर सुरु झालं असून सेलिब्रिटींपासून खेळाडूंपर्यंत आणि कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सर्वचजण इंडिया टुगेदर या हॅशटॅगने ट्विट करताना दिसत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आता ट्विट करुन या ट्विटर मोहिमेत सहभाग दर्शवल्याचं दिसून येतंय.
राजधानी दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून केंद्रीय कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांचा आवाज आता जगभर पसरत आहे. शेतकरी आंदोलनाला जागतिक स्तरावरून पाठिंबा मिळत असल्याचे दिसून आले. आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहाना हिने शेतकरीआंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. यासंदर्भात, सर्वप्रथम अभिनेता अक्षय कुमारने ट्विट करुन मत मांडलं. त्यानंतर, मास्टरब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरने आपले मत मांडले. त्यानंतर, गाणगोकिळा लता मंगेशकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी ट्विटरवरुन सरकारच्या बाजुने आपलं मत मांडायला सुरुवात केली आहे. तसेच, भाजपा नेतेही ट्विट करुन परराष्ट्र मंत्रालयाची री ओढत असताना दिसून येत आहे. भाजपा नेते आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट इंडिया टुगेदर या हॅशटॅगने ट्विट केलंय.
कोणताही प्रचार आमच्या देशाचं ऐक्य आणि प्रगतीला अडथळा आणू शकत नाही. नवीन भारत घडविण्याच्या आपल्या वेगवान प्रवासाला याने बाधा येणार नाही, किंवा आव्हान देऊ शकत नाही, असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. भारत एकसंघ असून एकता हीच यशाची गुरुकिल्ली आहे, जी प्रत्येक भारतीयांच्या रक्तात आहे, असेही फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
परराष्ट्र मंत्रालयाचं ट्विट
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय की, भारताच्या संसदेने व्यापक चर्चा आणि संवादानंतर कृषी क्षेत्राच्या संबंधित सुधारणा करणारे कायदे मंजूर केले आहेत. हा कायद्यामुळे शेतकऱ्यांना अधिक लवचिकता आणि विस्तीर्ण बाजारपेठ मिळू शकेल. ही सुधारणा आर्थिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत शेतीचा मार्ग आहेत. भारतातील काही भागातील शेतकऱ्यांचा छोटा गट या सुधारणांशी सहमत नाही. भारत सरकारने आंदोलकांच्या भावनांचा आदर करून त्यांच्या प्रतिनिधींशी संवाद सुरू केला आहे. या प्रयत्नात आतापर्यंत अकरा फेऱ्या झाल्या आहेत. ज्यामध्ये केंद्रीय मंत्री सहभाग घेत आहेत, केवळ सरकारच नाही,तर पंतप्रधानांकडूनही कृषी कायद्याला स्थगित करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने ट्विट करताना #IndiaTogether आणि #IndiaAgainstPropagenda हा हॅशटॅग वापरला आहे.
सचिन तेंडुलकरचं ट्वीट
सचिन तेंडुलकरने ट्विट करत, भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड मान्य नाही. बाह्यशक्ती बघ्याची भूमिका घेऊ शकतात. मात्र, हस्तक्षेप करू शकत नाही. भारतीयांना भारत माहिती आहे आणि त्यांनी भारतासाठी निर्णय घ्यावा. देश म्हणून आपण सर्वजण एकत्र राहू, असे ट्विट सचिनने केले. या ट्विटसोबत #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda हे दोन हॅशटॅगही सचिनने वापरले आहेत. त्यानंतर, विराट कोहली, रोहित शर्मा, अभिनेता अक्षय कुमार, अजय देवगण, सुनील शेट्टी यांनीही ट्विट करुन हा Propaganda भारतविरोधी असल्याची भूमिका घेतली.
तापसी पन्नूचं ट्विट
शेतकरी आंदोलनावरुन सुरु झालेल्या ट्विटर वॉरवर आता इतरही सेलिब्रिटी मैदानात उतरुन आपलं मत मांडत आहेत. मात्र, तापसी पन्नूने या सेलिब्रिटींच्या मताला चपराक मारण्याचं काम केलंय. जर एखादे ट्विट आपल्या ऐक्याला त्रास देत असेल, एखादा विनोद तुमचा विश्वास गमावत असेल किंवा एखादा शो तुमच्या धार्मिक श्रद्धेला तडा देईल. तर, तुम्हालाच तुम्हीच मुल्यप्रणाली आणखी ताकतवान बनण्यासाठी कार्य केले पाहिजे. मग, इतरांसाठी ते ‘Propagand Teacher' बनणार नाही.
रिहाना अन् मीना हॅरीस यांचं ट्विट
आंतरराष्ट्रीय गायिका रिहानाने ट्विटरवरून शेतकरी आंदोलनाबाबत आपण का बोलत नाही? असा सवाल केला त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर शेतकऱ्यांच्या आंदोलनाची चर्चा झाली. रिहानानंतर अमेरिकेच्या राष्ट्रपती कमला हॅरिस यांची पुतणी मीना हॅरिस, पर्यावरण कार्यकर्ते ग्रेटा थनबर्ग, पॉर्नस्टार मिया खलिफा यांनीही शेतकरी मुद्द्यावरून ट्विट केले. मीना हॅरिसनं लिहिलं की, आपण सगळ्यांनी भारतात इंटरनेट शटडाऊन आणि शेतकरी आंदोलनकर्त्यांवर पोलिसांचा हिंसाचार याचा निषेध व्यक्त केला पाहिजे. ट्विटरवरून गेल्या २४ तासांत रिहानाच्या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावर भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी केलं आहे.