मुंबई - ठाण्यातील मुंब्रा शाखेवरून शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंब्रा येथे जाऊन शाखेची पाहणी केली. यावेळी ठाकरे यांनी शिंदे गट तसेच राज्य सरकारवर सडकडून टीका केली. या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रत्युत्तर देताना खोचक शब्दांत टीका केली. शिवसेनेच्या दोन्ही गटाचा वाद विकोपाला गेला असून यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला असता, त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं.
बुलडोझरने शिवसेनेची शाखा पाडली, पण खरा बुलडोझर घेऊन मी मुंब्र्यातील रस्त्यावर आलो आहे. आपले बॅनर फाडल्याचे मला कळले. मात्र, निवडणुका येऊ द्या, मग दाखवतो, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिला होता. पोलिसांनी शाखाचोराचे रक्षण केले. प्रशासन हतबल झाल्याचे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. आज येथे काही विपरित घडले असते तर महाराष्ट्राची अब्रू गेली असती. पोलिस बाजूला करून भिडा, आमची तयारी आहे. या गद्दारांना येणाऱ्या सर्व निवडणुकांत पराभूत करा, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता एकनाथ शिंदेंवर केली होती. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिले. या दोन्ही नेत्यांच्या वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर देणं टाळलं.
आपली दिवाळी ही गरिब व सर्वसामान्य लोकांमध्ये साजरी केली पाहिजे, असं आम्हाला आमच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं होतं. त्यामुळेच, आज आम्ही कुलाब्यातील सर्वात जुन्या कोळी वाड्यात जाऊन येथील बांधवांसोबत दिवाळीचा सण साजरा केला. येथे लोकांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला, म्हणूनच त्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळत आहे, असे म्हणत फडणवीसांनी दिवाळी साजरी केल्याचं सांगितलं. तसेच, महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या. यावेळी, त्यांना काल मुंब्र्यातील शिवसेना शाखेवरुन झालेल्या टीकेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर. उत्तर देणं फडणवीसांनी टाळलं. कालचा दिवस काल गेला, आज नवीन दिवस सुरू झाला. आज दिवाळीवर बोलुया, असे फडणवीसांनी म्हटले.
फुसके बार न वाजताच निघून गेले - शिंदे
सध्या ठाण्यात दिवाळीपूर्वीच आतषबाजी सुरू झाली असून, शहरात काही फुसके बार आले होते जे न वाजताच निघून गेले. दुसरीकडे शिवसैनिकांचे फटाके असे काही वाजले की त्यांना माघार घ्यावी लागली, या शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेवर पलटवार केला. ठाकरे गटाच्या ताब्यात असलेली शिवसेना शाखा आठवडाभरापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ताब्यात घेऊन जमीनदोस्त केल्याने या शाखेच्या जागेला भेट देण्याकरिता उद्धव ठाकरे दिवाळीत नेत्यांसह शिवसैनिकांचा फौजफाटा घेऊन मुंबईहून दाखल झाले. शिंदे गटाच्या कार्यकत्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत 'कलानगर वापस चले जाओ', अशी घोषणाबाजी केली. त्यामुळे सुमारे तासभर मुंब्रा परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.