मुंबई – आधुनिकतेच्या दिशेने देश वाटचाल करत असताना अद्यापही काही गोष्टी बदललेल्या दिसत नाहीत. देशाच्या आर्थिक राजधानीत मुंबईत असाच प्रकार घडला आहे. एका दिव्यांग मॉडेलला ज्या समस्येला सामोरे जावं लागलं त्यावरून युझर्सने संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. दिव्यांग अधिकार कार्यकर्त्या विराली मोदी यांनी त्यांच्या लग्नावेळी मुंबई विवाह रजिस्ट्रार कार्यालयात आलेला अनुभव शेअर केला. त्यांच्या ट्विटवर तात्काळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत या प्रकारावर लक्ष देऊ असं आश्वासन दिले आहे.
विराली मोदी यांनी बुधवारी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिलो होती, त्यात म्हटलं की, १६ ऑक्टोबरला मी मुंबईच्या खार येथील रजिस्ट्रार कार्यालयात विवाह करण्यासाठी गेले होते. परंतु हे ऑफिस दुसऱ्या मजल्यावर होते. याठिकाणी दिव्यांग लोकांना जाण्यासाठी कुठलाही मार्ग नाही. इतकेच नाही तर कार्यालयात लिफ्टही नाही. अशावेळी विवाहाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना खाली येण्याची विनंती केली. परंतु कुठल्याही अधिकाऱ्याने दखल घेतली नाही. कार्यालयात लिफ्ट नसल्याने मला वरच्या मजल्यावर जाण्यास खूप अडचणी आल्या. रजिस्ट्रार कार्यालयातील जिनेही सरळ आहेत. रेलिंगची अवस्थाही ठीक नाही अशी तक्रार तिने केली.
त्याचसोबत हे योग्य आहे का? मी व्हिलचेअरवर असल्याने मला लग्न करण्याचा अधिकार नाही का? जर मला वरच्या मजल्यावर जाताना काही दुखापत झाली असती तर? त्यासाठी जबाबदार कोण? माझ्या देशाचे सरकार आणि नागरिक माझ्या दिव्यांगाला स्वीकार करू शकत नाही. या कठीण परिक्षेत माणुसकीवरील विश्वासही संपला. मी कुठली वस्तू नाही जिला २ मजले चढवून नेले जाईल. मी माणूस आहे आणि मलाही अधिकार आहेत असंही विराली मोदींनी म्हटलं.
दरम्यान, विराली मोदीच्या या तक्रारीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घेतली. विरालीच्या ट्विटला उत्तर देत त्यांनी या मुद्द्यांकडे आम्ही लक्ष देऊ. सर्वप्रथम तुम्हाला लग्नासाठी शुभेच्छा. आपल्याला जो त्रास सहन करावा लागला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हाला आलेल्या अनुभवाचा मला खेद वाटतो. मी वैयक्तिकपणे या प्रकरणाचा आढावा घेत आहे. लवकरच मुंबईतील रजिस्ट्रार ऑफिसमध्ये सकारात्मक पाऊले उचलण्यासाठी कार्यवाही करू असं आश्वासन फडणवीसांनी विराली मोदी यांना दिले. फडणवीसांनी संबंधित रजिस्ट्रार कार्यालयातील अधिकाऱ्यांना फोन करून या प्रकाराची दखल घ्या असा आदेश दिला. फडणवीसांच्या या तत्परतेवर विराली मोदीनं त्यांना धन्यवाद म्हटलं.