Devendra Fadnavis On Nana Patole: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात राज्यभर भाजपाची आंदोलनं सुरू आहेत. नाना पटोले यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपा नेत्यांनी राज्यपालांकडे केली आहे. तसंच राज्यात ठिकठिकाणी नाना पटोले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन आणि चपलाचा हार घातला जात आहे. काही ठिकाणी रस्तारोको आंदोलन केलं गेलं. नाना पटोलेंच्या याच विधानाचा समाचार राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.
'नाना पटोलेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांना चांगल्या डॉक्टरांना दाखवण्याची गरज आहे', अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. नाना पटोले यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून त्यांच्या पक्षातील वरीष्ठ नेत्यांनी त्यांच्याकडे लक्ष देऊन चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन जावं, असं फडणवीस म्हणाले.
काय म्हणाले होते नाना पटोले? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांशी बोलताना ‘मी मोदीला मारू शकतो, शिवीगाळही करू शकतो’, असं म्हटलं होतं. त्यानंतर नाना पटोले यांनी मी संबंधित विभागातील मोदी नावाच्या गावगुंडाबाबत बोलत होतो असं स्पष्टीकरण दिलं होतं. पटोलेंच्या एका विधानानं वादळ निर्माण झालेलं असतानाच त्यांनी काल इगतपुरीमध्ये आणखी वादग्रस्त विधान केलं.
'ज्याची बायको पळते, त्याचे नाव मोदी ठरते', असं विधान नाना पटोले यांनी काल केलं. इगतपुरी येथे मुंबई प्रदेश काँग्रेसचे तीन दिवसांचे प्रशिक्षण शिबिर झाले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर जोरदार टीका केली होती. नाना पटोलेंच्या विधानानंतर राज्यभर भाजपाकडून जोरदार निदर्शनं केली जात आहेत.