मुंबई : मुंबईत लोकलनंतर बेस्टची सेवा ही मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. परंतू या बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागात कार्यरत असलेल्या ७२६ कामगारांचा सेवेत कायम सामावून घेण्याबाबत मागील १६ वर्षांपासून संघर्ष सुरु होता. याबाबत या कामगारांनी वेळोवेळी आंदोलने देखील केली होती. परंतू बेस्टच्या नैमित्तिक कामगारांच्या या आंदोलनाची आता यशस्वी सांगता झाली असून, आमदार प्रसाद लाड अध्यक्ष असलेल्या आणि श्रमिक उत्कर्ष सभेशी संलग्न असलेल्या द इलेक्ट्रिक युनियनच्या माध्यमातून बेस्टच्या विद्युत विभागातील या नैमित्तिक कामगारांचा प्रश्न सुटला आहे.
१२३ नैमित्तिक कामगारांना कायम सेवेत सामावून घेण्याबाबतचे नियुक्ती पत्र, मुंबईतील सह्याद्री शासकीय अतिथी गृह येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आले. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात १० कामगारांना नियुक्ती पत्र देण्यात आली. उर्वरित कामगारांना बेस्ट प्रशसकीय भवन (इलेक्ट्रिक हाउस) कुलाबा येथे नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले.
लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून, त्यांची कामं करून, त्यांची मनं जिंकण्याची कामं करण्याचं कार्य आमदार प्रसाद लाड यांनी केलं असल्याची भावना यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. त्यांची साथ मिळाली आणि कामाला गती मिळाली असल्याचे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले. बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागातील उर्वरित ६०३ कामगारांना देखील न्याय देण्यासाठी मार्ग काढण्यात येईल, असा विश्वास यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
दिवाळीच्या आधीच या कामगार बांधवांना कायम सेवेत सामावून घेण्याबाबतचे नियुक्ती पत्र तयार झाले होते, परंतू कामगारांच्या आग्रहाखातर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, त्यांना हे नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. १६ वर्षांच्या संघर्षानंतर या नैमित्तिक कामगार बांधवांचा विजय झाला असून, याकरिता राज्य सरकार, बेस्ट प्रशासन आणि मुंबई महापालिकेचे आभार व्यक्त करतो, अशी भावना आमदार प्रसाद लाड यांनी यावेळी व्यक्त केली. उर्वरित ६०३ कामगार बांधवांना देखील तात्काळ टेम्पररी करावे आणि पुढे जावून सेवेत कायम करावं, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
सह्याद्री शासकीय अतिथी गृह येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदार प्रसाद लाड, बेस्टचे महाव्यवस्थापक विजय सिंघल, मुख्य महाव्यवस्थापक आर. डी. पाटसुटे, कर्मचारी व्यवस्थापक के. एम.परमाशे, आमदार गोपीचंद पडळकर, द इलेक्ट्रिक युनियनचे संजय घाडीगावकर, श्रमिक उत्कर्ष सभेचे भालचंद्र साळवी आणि बेस्टचे कामगार व कर्मचारी उपस्थित होते.