Join us

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी मौन सोडलं; विरोधकांना फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2024 11:59 AM

या घटनेबाबत बऱ्याच गोष्टी पोलिसांसमोर आल्या आहेत. त्या योग्यवेळी उघड करण्यात येतील असं उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुंबई -  Devendra Fadnavis on Abhishek Ghosalkar ( Marathi Newsअभिषेक घोसाळकर यांची हत्या वैयक्तिक वैमनस्यातून झाली असून पोलीस या घटनेचा तपास करत आहे. विरोधकांचे आरोप राजकीय असून त्यांनी राजीनाम्याची मागणी केली त्यात आश्चर्य वाटत नाही अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे. 

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अभिषेक घोसाळकर यांच्याबाबतीत घडलेली घटना दु:खद, एका तरुण नेत्याचे असं निधन व्हावं हे अतिशय गंभीर आहे. या प्रकरणाला काही लोक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करतायेत हे योग्य नाही. ही घटना गंभीर असली तरी ज्याने गोळ्या घातलेल्या तो मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर यांचे एकत्रित पोस्टर्स पाहायला मिळतात. वर्षोनुवर्ष ते एकत्रित काम करतायेत. आता कुठल्या विषयातून मॉरिसनं अभिषेकवर गोळ्या झाडल्या आणि स्वत:लाही गोळ्या मारून घेतल्या हा निश्चितपणे महत्त्वाचा विषय आहे. या घटनेची चौकशी सुरू आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच या घटनेबाबत बऱ्याच गोष्टी पोलिसांसमोर आल्या आहेत. त्या योग्यवेळी उघड करण्यात येतील. जी काही कारणे लक्षात येतायेत ती वेगवेगळी आहेत. त्या कारणांची खातरजमा केल्यानंतर आपल्यासमोर माहिती ठेवण्यात येईल. ही घटना गंभीर आहे अशा घटनांचे राजकारण करणे योग्य नाही. या घटनेमुळे कायदा सुव्यवस्था संपलेला आहे अशी विधाने करणे योग्य नाही. वैयक्तिक वैमनस्यातून ही घटना घडली आहे. तथापि, याबाबत बंदूक, लायसन्स असतील, बंदुका कुठून आल्या, लायसन्स देताना आणखी काही खबरदारी घेतली पाहिजे का याबाबत राज्य सरकार निश्चित विचार करेल असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. 

त्याचसोबत विरोधक पूर्णपणे राजकीय आरोप करत आहेत. ही घटना गंभीर आहे. परंतु विरोधी पक्षाची स्थिती अशी झालीय की एखाद्या गाडीखाली श्वान आला तरी ते गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील. मात्र ही घटना गंभीर असल्याने विरोधक राजीनामा मागतायेत त्यात आश्चर्य वाटत नाही. या सगळ्या घटनांचे राजकारण ते विरोधक करू इच्छित आहेत. ही जी हत्या झालीय ती वैयक्तिक वैमनस्यातून झालेली आहे ही विरोधकांना माहिती आहे. पण विरोधी पक्षाचे काम विरोधी पक्ष करतोय असा टोला देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना लगावला. 

काय आहे प्रकरण?

मुंबईच्या दहिसर परिसरातील ठाकरे गटाचे उपनेते विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीनं त्याच्या कार्यालयात अभिषेक घोसाळकर यांना बोलावले. त्यानंतर फेसबुक लाईव्ह करत आता दोघांमधील वाद संपल्याचं सांगितले. मात्र त्याच लाईव्हमध्ये मॉरिसने अभिषेकची गोळ्या मारून हत्या केली. त्यानंतर आरोपी मॉरिसनेही स्वत:वर गोळ्या मारून आत्महत्या केली. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरेभाजपापोलिसअभिषेक घोसाळकर