'देवेंद्र फडणवीसांनी बिहार आणलं, आता महाराष्ट्रातही पुन्हा येणार.. येणारच'
By महेश गलांडे | Published: November 10, 2020 06:52 PM2020-11-10T18:52:56+5:302020-11-10T19:00:39+5:30
बिहार विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाने प्रभारी म्हणून राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना संधी दिली होती. फडणवीस यांनी बिहार निवडणुकांसाठी रणनिती आखत प्रचारही केला.
पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि संयुक्त जनता दलाला बहुमत मिळताना दिसत आहे. मात्र राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसचं महागठबंधन सत्ताधारी एनडीएला कडवी टक्कर देत आहे. मतमोजणीच्या सुरुवातीला मागे पडलेल्या भाजपनं नंतर जोरदार मुसंडी मारली. गेल्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला भाजप यंदा थेट पहिल्या क्रमांकासाठी राजदशी स्पर्धा करताना दिसत आहे. याचं श्रेय भाजप नेते प्रसाद लाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. त्यानंतर, आता आमदार नितेश राणे यांनीही ट्विट करुन बिहार निवडणुकांचं यश देवेंद्र फडणवीसांमुळेच असल्याचं ते म्हणाले.
बिहार विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाने प्रभारी म्हणून राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना संधी दिली होती. फडणवीस यांनी बिहार निवडणुकांसाठी रणनिती आखत प्रचारही केला. मात्र, निवडणुकांच्या अंतिम टप्प्यात फडणवीस यांना कोरोनाची बाधा झाल्याने ते मुंबईत परतले होते. मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात त्यांनी उपचार घेऊन कोरोनावर मात दिली. दरम्यानच्या, काळात निवडणूक प्रचाराची सांगता झाली. मात्र, फडणवीस यांनी आपली जबाबदारी निभावली होती. फडणवीस यांच्या रणनितीचं आणि नेतृत्वाच हे यश असल्याचं भाजपाचे नेते आणि माजी आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलंय. त्यानंतर, आता शिवसेना नेते संजय राऊत यांनीह देवेंद्र फडणवीसांनी अनुभावाच्या जोरावर बिहारमध्ये सुत्र हलवली असे म्हटलं. आता, नितेश राणेंनीही देवेंद्र फडणवीसांमुळेच बिहार भाजपाने जिंकल्याचं म्हटलंय.
देवेंद्र फडणवीसांनी बिहार आणलं, आता महाराष्ट्रातही देवेंद्र फडणवीसच पाहिजेत, पुन्हा येणार.. येणारचं, असे म्हणत महाराष्ट्रात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असे नितेश राणेंनी सूचवलं आहे. नितेश राणेंनी आणखी एक ट्विट केलं असून देशातील जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. त्यामुळेच, देशातील सर्वच पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला यश मिळाल्याचं सांगितलं. तसेच, भारत देश पुढे जातोय, त्याचे एकच उत्तर आहे ते म्हणजे भाजपा, आणि भाजपा महाराष्ट्र, असे राणेंनी म्हटलं आहे.
बिहार देवेंद्रजी नी आणले..
— nitesh rane (@NiteshNRane) November 10, 2020
आता..
महाराष्ट्र ला पण देवेंद्रजीच पाहिजे..
पुन्हा येणार..येणारच!!!
संजय राऊत यांच्याकडूनही कौतुक
''जे जिंकले त्यांचं अभिनंदन करण्याची आमची परंपरा आहे. देवेंद्र फडणवीस हे विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाकडून बिहारचे प्रमुख होते, त्यांना महाराष्ट्राचा अनुभव दांगडा आहे. फडणवीसांनी नक्कीच इथं बसून बिहारमध्ये सुत्रं हलवली असतील, संपूर्ण केंद्रीय सत्ता तिथं कामाला लागली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही तेथे 17 ते 18 सभा घेतल्या आहेत,'' असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. संजय राऊत यांनी एकप्रकारे देवेंद्र फडणवीसाचं कौतुक केलंय. पण, इथ बसून असे म्हणत टोलाही लगावला आहे.
शरद पवारांचा खोचक टोमणा
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना बिहारमधील भाजपच्या कामगिरीतील फडणवीस यांच्या योगदानाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर 'हा चमत्कार आमच्या डोक्यात प्रकाश पाडणारा होता; फार चांगली माहिती सांगितली तुम्ही,' अशी खोचक प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. यावेळी त्यांनी राजद नेते तेजस्वी यादव यांचं कौतुक केलं. तेजस्वी यांनी अतिशय चांगली लढत दिली. त्यांनी भाजप, जदयू विरोधात चांगली कामगिरी केली, अशी स्तुतीसुमनं पवार यांनी उधळली.